टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे सीईओ तोशिरो मुतो यांना धास्ती
वृत्तसंस्था/ टोकियो
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा सध्याच्या घडीला एका वर्षाने लांबणीवर टाकली गेली असली तरी जपानमध्ये कोरोना व्हायरसमुळे सारीच घडी कोलमडून गेली असल्याने 2021 मध्ये तरी ही स्पर्धा होऊ शकेल का, याबद्दल सध्या प्रश्नचिन्हच असल्याची भीती टोकियो ऑलिम्पिक सीईओ तोशिरो मुतो यांनी व्यक्त केली. जपानचे पंतप्रधान शिन्झो ऍबे यांनी या आठवडय़ात कोरोना व्हायरस विषाणूविरुद्ध लढण्यासाठी आणीबाणी जाहीर केली आहे.
‘पुढील जुलैपर्यंत तरी या परिस्थितीवर नियंत्रण ठेवता येणार का, याबद्दल सध्या कोणीच काही सांगू शकत नाही’, असे टोकियो आयोजन समितीचे सीईओ तोशिरो मुतो यांनी इंटरप्रेटरच्या माध्यमाने आयोजित पत्रकार परिषदेत नमूद केले. आम्ही कोणतेही ठोस उत्तर देण्याच्या परिस्थितीत नाही, असे ते म्हणाले.
कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी तातडीने पावले उचलली नाहीत, असा आरोप आता पंतप्रधान शिन्झो ऍबे यांच्यावर होत आहेत. सध्या पुढील वर्षी आयोजित ऑलिम्पिकसाठी नव्याने तयारीला सुरुवात करणे, हा पर्याय योग्य ठरतो. त्यामुळे, पुढील वर्षी स्पर्धा होऊ न शकल्यास काय, यावर विचार करण्याची गरज वाटत नाही, असे ते एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.
कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी मानवजातीने तंत्रज्ञान व हुशारीच्या सहाय्याने एकत्रित प्रयत्न करायला हवेत, त्याचबरोबर उपचारपद्धती, औषधे व लसी अधिक विकसित करायला हव्यात, याचा त्यांनी पुढे उल्लेख केला. जपानमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 5 हजार रुग्ण आढळून आले असून 100 जणांचे बळी गेले आहेत. जगभरातील सर्वाधिक वृद्ध जपानमध्ये आढळून येतात आणि वृद्धांनाच या कोरोना व्हायरसची भीती अधिक असते. यामुळे देखील तेथे अधिक चिंतेचे वातावरण आहे.