ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगल्या कामगिरीनंतर आता आम आदमी पार्टी (आप) 2022 मध्ये होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीत सर्व जागा लढवणार आहे, अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवला यांनी आज म्हणजेच सोमवारी केली.


मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज एक दिवसाच्या गूजरात दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी गुजरातमध्ये आम आदमी पार्टीचा प्रसार होण्यासाठी ते अहमदाबादेत पोहचले आहेत. यावेळी त्यांच्या उपस्थितीत काही जणांनी आप मध्ये प्रवेश देखील केला आहे. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
ते म्हणाले, 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आप पक्षाने सर्व 182 जागांवर लढणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी देखील सुरू केली आहे. पुढे ते म्हणाले, गुजरातमधील नागरिक विचार करत आहेत की, जर दिल्लीमध्ये वीज मोफत दिली जाते, पाणी आणि रूग्णालयांची परिस्थिती देखील चांगली आहे. तर मग इथे का नाही? मी नागरिकांना विश्वास देतो की, विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे सरकार आले तर येथील परिस्थिती बदलेल. मागील 70 वर्षांपासून येथील रुग्णालये सुधारलेली नाही. मात्र आता परिस्थिती लवकरच बदलेल.


पुढे ते म्हणाले, गुजरातची सध्या जी अवस्था झाली आहे त्याला भाजप व काँग्रेस सरकारचे कारस्थान जबाबदार आहे. मागील 27 वर्षांमध्ये एकाच पक्षाचे सरकार आहे. असे म्हणतात की काँग्रेस भाजपाच्या खिशात आहे. गुजरातमधील व्यापारी घाबरलेले आहेत. शिक्षण खराब आहे आणि चांगल्या दर्जाचे रूग्णालये नाहीत, कोरोना काळात गुजरात अनाथ झाले होते. आज गुजरातला एक सक्षम पर्याय मिळाला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांचा या वर्षातील हा दुसरा दौरा आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात केजरीवाल गुजरात मधील सूरतमध्ये गेले होते.