अमेरिकेत 30 हजार नवे रुग्ण
अमेरिकेत 24 तासांमध्ये 2,600 जणांनी जीव गमावला आहे. देशात आतापर्यंत 28,554 जणांचा बळी गेला आहे. अमेरिकेतील एकूण रुग्णांची संख्या 6 लाख 44 हजार 348 झाली आहे. न्यूयॉर्क प्रांतात 11 हजार 586 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 लाख 14 हजार 648 रुग्ण सापडले आहेत. अमेरिकेत लवकरच व्हेंटिलेटरचा मोठा साठा निर्माण होणार असल्याने अन्य देशांच्या गरजा पूर्ण केल्या जाणार असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
जी-20कडून गरीब देशांना मदत
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेने कोरोनाने ग्रस्त गरीब देशांसाठी तात्पुरत्या स्वरुपात कर्ज प्रदान करण्याच्या जी-20 समुहाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. शक्तिशाली तसेच वेगाने काम करण्याचा हा पुढाकार गरीब देशांच्या लाखो लोकांचे जीवन तसेच उपजीविका सुरक्षित ठेवण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. गरीब देशांच्या मदतीसाठी शक्य ती सर्व पावले उचलण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचे जागतिक बँक समूहाचे अध्यक्ष डेव्हिड मलाग आणि आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालिका क्रिस्टलिना जॉर्जिवा यांनी म्हटले आहे.
लस, उपचारासाठी निधीची गरज
कोरोनावरील उपचार तसेच लस विकसित करण्यासाठी आणखीन निधीची गरज आहे. केवळ एकत्रितपणे काम करून आम्ही या विषाणूला पराभूत करू शकतो, असे उद्गार युरोपीय महासंघाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनी काढले आहेत. एकत्रित प्रयत्नासाठी 4 मे रोजी एक ऑनलाईन संकल्प संमेलनाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरातील देश आणि संघटना यात योगदान देतील, अशी अपेक्षा असल्याचे लेयन यांनी ट्विट करत म्हटले आहे.
इटलीत स्थिती सुधारतेय
इटलीत कोरोना विषाणूमुळे पडणारे बळी तसेच नव्या रुग्णसंख्येत बुधवारी पुन्हा घट झाली आहे. इटलीत 24 तासांमध्ये 578 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2667 नवे रुग्ण सापडले आहेत. देशातील एकूण रुग्णांचा आकडा आता 1,65,155 झाला आहे. तर 21 हजार 645 जणांना जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेनंतर इटलीतच सर्वाधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. इटलीतील आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
स्पेनमध्ये 19 हजारांपेक्षा अधिक बळी
स्पेनमध्ये बुधवारी 557 जणांचा मृत्यू झाला असून 6 हजार 599 नवे रुग्ण सापडले आहेत. स्पेनमध्ये आतापर्यंत 19 हजार 130 जणांना जीव गमवावा लागला आहे. स्पेनच्या सरकारने टाळेबंदीचे नियम काही प्रमाणात शिथिल केले आहेत. काही उद्योग पुन्हा सुरू करण्यात आल्याने अर्थव्यवस्थेला पुन्हा वेग मिळणार आहे. लोकांना कामावर परतण्याची अनुमती देण्यात आली असली तरीही कठोर सुरक्षा नियमांचे पालन करावे लागणार आहे.
कॅनडा : टाळेबंदी कायम
कॅनडातील टाळेबंदी पुढील काही आठवडय़ांपर्यंत कायम राहणार असल्याचा इशारा पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी दिला आहे. टाळेबंदी मागे घेतल्यास सध्या शक्य झालेल्या उपाययोजना देखील करता येणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. कॅनडात आतापर्यंत 28 हजार 379 रुग्ण सापडले असून 1,010 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका तसेच युरोपीय देशांच्या तुलनेत कॅनडातील मृत्यूदर कमी आहे. स्थिती तुलनेने चांगली असली तरीही निर्बंध हटविले जाणार नाहीत. किमान 1 मेपर्यंत टाळेबंदी राहणार असल्याचे ट्रुडो म्हणाले.
जर्मनीत निर्बंध शिथिल
कोरोना विषाणूसंबंधी जर्मनीत लादण्यात आलेले निर्बंध आता हळूहळू संपुष्टात आणले जातील. परंतु सोशल डिस्टेंसिंग नियमाचे पालन 3 मेपर्यंत करावे लागणार आहे. लोकांनी दुकाने तसेच सार्वजनिक वाहतूक सेवेत मास्क वापरावा. पुढील आठवडय़ापासून काही दुकाने सुरु केली जातील. शाळा देखील 4 मेपासून सुरू केल्या जाणार असल्याची घोषणा जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी केली आहे. जर्मनीतील रुग्णांची संख्या वाढली असली तरीही तेथील मृत्यूदर बऱयाचअंशी नियंत्रणात आहे.
पाकिस्तानात 117 जणांचा मृत्यू
पाकिस्तानातील कोरोनाबाधितांची संख्या 6 हजार 297 झाली आहे. तर तेथे 117 जणांचा मृत्यू झाला आहे. पंजाब प्रांतात सर्वाधिक 3 हजार 16 तर सिंध प्रांतात 1,688 रुग्ण सापडले आहेत. खैबर पख्तूनख्वामध्ये 47 नवे रुग्ण सापडले असून यातील बहुतांश जण तबलिगी जमातचे सदस्य आहेत. तर बलुचिस्तानात 281 रुग्ण आढळले आहेत. पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी काही क्षेत्रांना दिलासा देत देशातील टाळेबंदी वाढविण्याची घोषणा केली आहे.