Tarun Bharat

2024 पॅरिस ऑलिम्पिक अधिक आव्हानात्मक असेल

केवळ 3 वर्षांचा कालावधी असल्याने ऍथलिट्सना वेगळी तयारी करावी लागेल, अभिनव बिंद्राचे प्रतिपादन

वृत्तसंस्था /मुंबई

एरवी ऑलिम्पिक सर्कलमध्ये 4 वर्षांचा कालावधी असतो. एक ऑलिम्पिक पूर्ण झ्ााल्यानंतर पुढील ऑलिम्पिकच्या तयारीसाठी 4 वर्षे पूर्ण हाताशी असतात. त्यामध्ये, वर्षभराची विश्रांती घेऊन, बाकी 3 वर्षात, ताज्या दमाने पुढील ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रित करता येते. मात्र, यंदा टोकियो ऑलिम्पिक एक वर्ष उशिराने झाले असल्याने 4 वर्षांचे ऑलिम्पिक सर्कल पूर्वीसारखे नसेल. यंदा केवळ 3 वर्षेच हाताशी असतील. या पार्श्वभूमीवर, 2024 मध्ये पॅरिस येथे होणारे पुढील ऑलिम्पिक अधिक आव्हानात्मक असेल, असे प्रतिपादन भारताचा पहिला वैयक्तिक सुवर्णजेता ऑलिम्पियन अभिनव बिंद्राने केले. अलीकडेच संपन्न झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमधील भारताच्या सर्वोत्तम प्रदर्शनाची देखील त्याने येथे प्रशंसा
केली.

टोकियोतील कामगिरी सर्वोत्तम

‘टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने 7 पदके जिंकली, ही आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे आणि यासाठी भारतीय पथक निश्चितच प्रशंसेला पात्र आहे. या ऑलिम्पिकमध्येही भारतासाठी अनेक चढउतार होते. पण, हा खेळाचा अविभाज्य घटक असतो. एकंदरीत आपली वाटचाल उत्तम झाली, हे सर्वात महत्त्वाचे’, असे अभिनव बिंद्रा पुढे म्हणाला.

‘ऑलिम्पिक झाल्यानंतर वर्षभराच्या कालावधीत ऍथलिट्स विश्रांती घेऊ शकतात. तितका वेळ त्यांच्या हाताशी असतो. पण, यंदा परिस्थिती वेगळी आहे. यंदा मागील ऑलिम्पिकसाठी जे कष्ट घेतले, त्यातून लवकर सावरत पुढील ऑलिम्पिकसाठी नव्याने, ताज्या दमाने शक्य तितक्या लवकर तयारी सुरु करावी लागणार आहे’, याचा त्याने पुढे उल्लेख केला. ईएलएमएस स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या विद्यमाने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये अभिनव बिंद्रा बोलत होता.

यापूर्वी, टोकियो ऑलिम्पिक पूर्वनियोजित रुपरेषेप्रमाणे 2020 मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनामुळे एक वर्ष उशिराने 2021 मध्ये त्याचे नियोजन झाले आणि यामुळे पॅरिस 2024 ऑलिम्पिकच्या तयारीसाठी ऍथलिट्सना केवळ 3 वर्षांचा कालावधी उपलब्ध असणार आहे. याशिवाय, ऑलिम्पिक पात्रता इव्हेंट व कोटा कमी होणार असल्याने ऍथलिट्ससमोर आणखी आव्हाने असणार आहेत.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकपटू नीरज चोप्राने वैयक्तिक गटातील दुसरे ऑलिम्पिक सुवर्ण जिंकून दिले. त्या पार्श्वभूमीवर, अभिनव बिंद्राने नीरजच्या कामगिरीची प्रशंसा केली. ‘तळागाळापर्यंत पोहोचत, शास्त्रीय पद्धतीच्या आधाराने उत्तम तयारीसाठी पोषक, अनुकूल वातावरणनिर्मिती करणे हे अधिक गुंतागुंतीचे, कठीण असेल. आपण फक्त वरिष्ठ स्तरावरील नेतृत्वाविषयी चर्चा करतो. पण, द्वितीय स्तरावर अनुकूल वातावरण निर्मिती कशी असावी, याबद्दल धडे देण्याची गरज आहे’, याचा बिंद्राने येथे उल्लेख केला.

‘शास्त्र, तंत्रज्ञान, इंजिनियरिंग, विश्लेषण, स्पोर्ट्स मेडिसिन याबाबत ऍथलिट्सना प्रशिक्षण हे केवळ वरिष्ठ स्तरावर नव्हे तर अगदी कनिष्ठ स्तरापासून होणे आवश्यक आहे’, असे 2008 बीजिंग ऑलिम्पिकमधील हा चॅम्पियन नेमबाज म्हणाला. देशात महाविद्यालयीन स्तरावरील क्रीडा पद्धती अद्याप पूर्ण विकसित झालेली नाही. त्यामुळे, कनिष्ठ स्तरावरुन इलाईट स्तरापर्यंत पोहोचताना बरेच खेळाडू गुणवत्ता असतानाही मागे पडताना दिसून येत आहेत, याचा अभिनवने शेवटी उल्लेख केला.

Related Stories

एटीपी, डब्ल्यूटीए, आयटीएफ स्पर्धा आणखी लांबणीवर

Patil_p

झिम्बाब्वे, न्यूझीलंड मालिकांसाठी पाकचे 35 खेळाडू जाहीर

Patil_p

सिंधू उपांत्यपूर्व फेरीत, लक्ष्य सेनची विजयी सलामी

Amit Kulkarni

दनुष्का गुणतिलका लंकेकडून निलंबित

Patil_p

भारतीय महिलांचे विश्वचषकातील आव्हान समाप्त

Patil_p

पाच फुटबॉल क्लब्सना परवाना मिळविण्यात अपयश

Patil_p