वैज्ञानिकांच्या भविष्यवाणीने वाढविली चिंता
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
बदलते हवामान, पाण्याची कमतरता आणि तापमानवाढीमुळे पुढील 30 वर्षांमध्ये लोकांच्या ताटातून भात गायब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. इलिनोइस विद्यापीठातील अमेरिकेच्या संशोधकांच्या एका पथकाने भारतात जगातील सर्वात मोठय़ा प्रमाणात तांदळाचे पीक घेणाऱया क्षेत्रांमध्ये अध्ययन केले आहे. 2050 पर्यंत तांदळाच्या उत्पादनात मोठी घट दिसून येणार असल्याचे या पथकाच्या अहवालात म्हटले गेले आहे.
मृदा (माती) संरक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात न आल्यास आणि पिकावेळी खतांचा वापर मर्यादित करण्यावर लक्ष न दिल्यास भविष्यात तांदळाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर खालावू शकते असे संशोधन पथकाने नमूद केले आहे. या पथकाने बिहारमधील नॉर्मन बोरलॉग संस्थेच्या तांदूळ उत्पादन केंद्रांवर स्वतःचे संशोधनाला मूर्त स्वरुप दिले आहे. 2050 पर्यंत तांदळाचे उत्पादन आणि पाण्याच्या मागणीचा अनुमान लावण्यासाठी हे संशोधन करण्यात आले होते.


बदलत्या हवामानाचा प्रभाव
या अध्ययनाचे प्रमुख लेख आणि इलिनोइस विद्यापीठात कृषी आणि बायोइंजिनियरिंग विभागाचे प्राध्यापक प्रशांत कलिता यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. बदलते तापमान, पाऊस आणि कार्बनडाय ऑक्साईडच्या वाढत्या प्रमाणाचा प्रभाव पडत आहे. तांदळासारख्या पिकाच्या वृद्धीसाठी आवश्यक घटकांवर प्रतिकूल प्रभाव पडत असल्याने उत्पादनाला फटका बसणे निश्चित असल्याचे कलिता यांनी सांगितले आहे.
पाण्याचा वापर
प्रति किलो तांदळाचे उत्पादन आणि प्रक्रियेत एकूण सुमारे 4000 लिटर पाणी वापरले जाते. कलिता यांच्या पथकाने तांदळाच्या उत्पादनासाठी आवश्यक पाण्याचे प्रमाण, उत्पादन दर आणि हवामान स्थितींचे आकलन केले आहे. तांदूळ उत्पादित करणारे शेतकरी हवामान बदलाच्या प्रभावांना सामोरे जाण्यासाठी कशाप्रकारे सज्ज होऊ शकतात हेही त्यांनी शोधून काढले आहे. तांदळाचे उत्पादन कायम राखण्यासाठी लागू केल्या जाणाऱया धोरणांची ओळख पटविण्यासाठी कॉम्प्युटर सिम्युलेशन मॉडेल तयार करण्यात आले होते.
उत्पादन प्रचंड प्रमाणात घटणर
तांदूळ उत्पादक शेतकऱयांनी वर्तमान पद्धतींसह शेती कायम ठेवल्यास त्यांचे उत्पादन 2050 सालापर्यंत प्रचंड प्रमाणात कमी होऊ शकते. पिकाची वृद्धी अवस्था आंकुचन पावत असल्याचे मॉडेलिंगचे परिणाम दर्शवितात. पेरणीपासून कापणीपर्यंतचा कालावधी अत्यंत वेगाने कमी होत आहे. याचमुळे पिकं वेगाने परिपक्व होत असून शेतकऱयांना पूर्ण लाभ मिळत नसल्याचा अनुमान प्राध्यापक कलिता याच्या अध्ययनानंतर व्यक्त करण्यात आला आहे.