अभेद्य होणार भारताचे हवाईक्षेत्र : फ्रान्ससोबत खरेदीचा करार : चीन अन् पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर वाढणार बळ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पुढील वर्षी एप्रिलपर्यंत भारताला आणखीन 16 राफेल लढाऊ विमाने फ्रान्सकडून मिळणार आहेत. भारताला जुलै महिन्यात यापूर्वीच 5 राफेल विमाने मिळाली आहेत. अशाप्रकारे एप्रिल 2021 पर्यंत भारताला एकूण 21 राफेल लढाऊ विमानांचे बळ प्राप्त होणार आहे. भारताने फ्रान्ससोबत 36 विमानांच्या खरेदीचा करार केला होता. राफेल विमानांमुळे भारतीय वायुदलाच्या मारकक्षमेत अभूतपूर्व भर पडणार आहे.
फ्रान्समधून येणाऱया राफेल विमानांना गोल्डन एअरो स्क्वॉड्रनमध्ये सामील केले जाणार आहे. 29 जुलै रोजी राफेल लढाऊ विमाने अंबाला वायुतळावर पोहोचली होती. त्यांचा वायुदलाच्या 17 स्क्वॉड्रनमध्ये समावेश करण्यात आला आहे. 5 नोव्हेंबर रोजी राफेल विमानांची पुढील खेप भारतात येणार आहे. यात 3 राफेल लढाऊ विमाने सामील असतील. हे विमाने फ्रान्समधून थेट अंबाला येथे पोहोचणार आहेत. या लढाऊ विमानांना इंधन भरण्यासाठी वाटेत थांबण्याची गरज भासणार नाही, त्यांचे रिफ्यूलिंग आकाशातच होणार आहे. यापूर्वी 29 जुलै रोजी भारतात पोहोचलेली विमाने अबूधाबी येथे थांबली होती.
गोल्डन एअरो स्क्वॉड्रनमध्ये तैनात
21 विमानांची डिलिव्हरी मिळण्यासह 18 राफेल लढाऊ विमानांसह गोल्डन एअरो स्क्वॉड्रन पूर्ण होणार आहे. तर उर्वरित 3 विमानांना हाशिमारा वायुतळावर तैनात करण्यात येणार आहे. हा वायुतळ पश्चिम बंगालमध्ये पूर्व सीमेवर आहे. तेथे राफेल तैनात केल्याने चीनच्या संभाव्य धोक्याला भारत चोखपणे हाताळू शकणार आहे. ही सर्व लढाऊ विमाने एमआयसीए आणि मेटय़ोर एअर टू एअर क्षेपणास्त्रांनी युक्त आहेत. याचबरोबर त्यांच्यात आकाशातून जमिनीवर क्रूझ क्षेपणास्त्राने हल्ला करण्याची क्षमता आहे.
जानेवारी-मार्चमध्येही डिलिव्हरी
नोव्हेंबरनंतर जानेवारीमध्ये दसॉ एव्हिएशन आणखीन 3 राफेल विमाने उपलब्ध करणार आहे. त्यानंतर मार्चमध्ये आणखीन 3 विमाने भारताला सोपविली जातील. एप्रिलमध्ये भारताला फ्रान्स आणखीन 7 विमाने सुपूर्द करणार आहे. अशाप्रकारे एप्रिलपर्यंत एकूण 21 लढाऊ विमाने ताफ्यात सामील होणार आहेत. ही सिंगल सीटर राफेल लढाऊ विमाने आहेत.