14 वर्षांखालील मुलांसह 55 हून अधिक वयाच्या भाविकांना प्रवेश नाही
श्रीनगर / वृत्तसंस्था
कोरोना संसर्गामुळे अंधुकतेच्या छायेत असलेली अमरनाथ यात्रा हय़ावेळी केवळ 14 दिवसांची असणार आहे. 21 जुलैपासून यात्रेला प्रारंभ होणार असून 3 ऑगस्टला श्रावण पौर्णिमेला सांगता होईल. 14 दिवसांच्या काळात पवित्र गुहेत सकाळी आणि संध्याकाळी होणारी विशेष आरती देशभर थेट प्रक्षेपित केली जाणार आहे. कोरोनाच्या धोक्यामुळे यंदा यात्रेमध्ये 14 वर्षाखालील मुलांना आणि 55 वर्षांपेक्षा कमी वयाच्या भाविकांना परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच आरोग्य प्रमाणपत्राव्यतिरिक्त कोरोना चाचणीही बंधनकारक करण्यात आली आहे. अमरनाथ यात्रा समितीच्या बैठकीमध्ये शनिवारी यासंबंधी निर्णय घेण्यात आला.
यात्रेत सहभागी होणाऱया भाविकांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. ऑनलाईन नोंदणी झाल्यानंतर यात्रेत सहभागी होण्यासाठी राज्यात आल्यानंतर तेथे कोरोना चाचणी केलेले वैद्यकीय प्रमाणपत्रही दाखवावे लागणार आहे. यात्रेची तयारी सुरू करण्यात आली असून विविध मार्गांवरील बर्फ बाजूला करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. स्थानिक मजुरांची कमतरता असल्याने बेस कॅम्प ते गुहेपर्यंत ट्रक बनविण्यात अडचणी येत आहेत. 21 जुलैपूर्वी बाथलचा मार्ग यात्रेकरूंसाठी तयार करण्यासाठी मंडळ सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. तथापि हा मार्ग सज्ज न झाल्यास बाल्टल बेस कॅम्पमधून हेलिकॉप्टरच्या सहाय्याने भाविकांना प्रवास करण्याची व्यवस्था केली जाणार आहे.