राज्यातील पाच खासगी शिकवणी संघटनांचा निर्णय
प्रतिनिधी / मिरज
कोरोनामुळे संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया गेल्याने विद्यार्थ्यांबरोबर खासगी क्लास चालकांचेही मोठे नुकसान झाले आहे. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने 21 जून पासून खासगी क्लास सुरू करणार असल्याचा निर्णय खासगी क्लास चालकांनी घेतला असल्याची माहिती प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनचे माजी राज्य अध्यक्ष प्रा. रविंद्र फडके यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तसेच अनेक मंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून अनेक वेळा निवेदने देऊन क्लास संचालकांची हलाखीची स्थिती विषद करून क्लासेस सुरू करण्याची मागणी केली होती. पण त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. म्हणून पालकांच्या संमतीने आरोग्यविषयक नियमांची काळजी घेऊन महाराष्ट्रातील सर्व क्लासेस 21 जून पासून सुरू करण्याचा निर्णय झाला असल्याचे फडके यांनी सांगितले.