किणये गावचा सुपुत्र ओमकार दळवीची गरुडझेप :
आण्णाप्पा पाटील/ बहाद्दरवाडी
निश्चित ध्येय आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर किणये गावचा सुपुत्र ओमकार उत्तम दळवी हा लेफ्टनंट बनला आहे. डेहराडून येथे झालेल्या इंडियन मिलिटरी अकॅडमी (आयएमए) या अधिकारी प्रशिक्षणात घोडेस्वारी या प्रकारातून त्याने लेफ्टनंटपदाला गवसणी घातली आहे. अवघ्या एकवीस वर्षांच्या तरुणाने बेळगावचे नाव देशात उंचावले आहे.
आयएमएच्या एक वर्षाच्या खडतर प्रशिक्षणात अनेक अडथळय़ांचा सामना करत त्याने हे प्रशिक्षण पूर्ण केले. दि. 13 जून रोजी डेहराडून येथे झालेल्या इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या पासिंग आऊट परेडच्या शानदार समारंभात सैन्यदल प्रमुख एम. एम. नरवणे यांच्या हस्ते दोन स्टार, ब्लेझर, मानचिन्ह देऊन त्याला गौरविण्यात आले.
घोडेस्वारीमध्ये नावीन्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल त्याला उत्कृष्ट घोडेस्वार व डेक्कन हॉर्स ट्रॉफी देण्यात आली. ओमकारने लेफ्टनंटपदापर्यंत मजल मारली असल्याने जगातील एकमेव अशा भारतामधील घोडेस्वारीसाठी प्रसिद्ध असलेल्या 61 कॅविलरीमध्ये त्याची निवड झाली आहे.
सध्या ओमकार दळवी लेफ्टनंटपदी राजस्थानमधील बारमेर येथे 81 आर्मड् या युनिटमध्ये रुजू झाला आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. देशसेवा करीत घोडेस्वारी या प्रकारातून भविष्यात ऑलिम्पिकमधून देशाला पदक मिळवून देण्याचे आपले ध्येय आहे, असे लेफ्टनंट ओमकारने सांगितले.
यापूर्वी पुणे येथील खडकवासला येथे झालेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी प्रशिक्षणात ओमकारने सुवर्णपदक मिळविले आहे. ओमकारला लहानपणापासूनच खेळांची आवड आहे. त्याचे बारावीपर्यंतचे शिक्षण डेहराडून येथील राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर गेल्या वषी त्याची डेहराडून येथे एक वर्षाच्या अधिकारी प्रशिक्षणासाठी निवड झाली होती.
ओमकारचे वडील उत्तम दळवी हेसुद्धा लष्करी सेवेत आहेत. राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजमध्ये रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत. देशसेवेप्रती वडिलांच्या असणाऱया नि÷sमुळेच आपणही देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगले. माझ्यासाठी वडीलच प्रेरणास्थान आहेत, असे ओमकार आवर्जून सांगताना दिसतो.
देशसेवेचे व्रतच…
आपल्या मुला-बाळांवर चांगले संस्कार घडविण्याची जबाबदारी ही आई-वडिलांवर असते. दळवी कुटुंबातील सदस्यांनी देशसेवेचे व्रतच घेतलेले आहे. उत्तम दळवी यांचा लहान मुलगा वैभव हासुद्धा एनडीएमध्ये प्रवेशाची तयारी करतो आहे. पती व मोठा मुलगा लष्करात आणि आता लहान मुलालाही लष्करी सेवेत घालणार आहेत. यामध्ये या मुलांची आई उज्ज्वला यांनी आपल्या मुलांना सुसंस्कारित व धाडसी बनविले आहे, असेच स्पष्ट दिसून येते.
किणये गावातील निवृत्त शिक्षक तानाजी डुकरे व हभप पुन्नाप्पा दळवी यांचा ओमकार हा नातू आहे. गावातील या दोघा आजोबांनी मला नेहमीच प्रोत्साहन व मार्गदर्शन केले आहे, असे ओमकार सांगतो.
गावचा तरुण लेफ्टनंट झाला असल्याने किणये गावातील नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. ग्रामीण भागातील या तरुणाची झेप सर्व तरुणांना आदर्श ठरणारी आहे.