23 लाख वाहनांचा खप ः फाटा संघटनेची माहिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
उत्सवी काळ संपल्यानंतरदेखील देशातील वाहन विक्रीमध्ये तेजी कायम राहिली आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात प्रत्येक सेकंदामागे एक वाहन विक्री झाले होते. नोव्हेंबरमध्ये एकूण वाहन विक्री 23.80 लाख इतकी ऐतिहासिक स्तरावर पोहोचली होती. मागील वर्षाच्या नोव्हेंबरमधील तुलनेमध्ये विक्रीमध्ये 26 टक्के वाढ नोंदविली गेली आहे. याचदरम्यान मागच्या महिन्यात दुचाकी वाहन विक्री 23 टक्के इतकी वाढली आहे.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन (फाडा)संघटनेने ही माहिती दिली आहे. नोव्हेंबर महिन्यात 23,80,465 इतक्या एकूण वाहनांची विक्री झाली आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत ही वाढ 13 टक्के अधिक आहे. मार्च 2020 नंतर अशा प्रकारे सर्वाधिक वाहन विक्री होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जाते.
रोज 78 हजार वाहनांचा खप
नवरात्री ते दिवाळीपर्यंतच्या 42 दिवसांच्या उत्सवी काळापेक्षा नोव्हेंबरच्या 30 दिवसामध्ये सर्वाधिक वाहन विक्री झाली आहे. नोव्हेंबरमध्ये रोज जवळपास 78 हजार इतक्या वाहनांची विक्री झाली आहे. उत्सवी काळामध्ये हीच रोजची विक्री 68 हजार इतकी होती.
फाडाच्या मते उत्सवी हंगामानंतर थोडे दिवस वाहनांची विक्री कमी राहते. पण या खेपेला मात्र तसे झालेले नाही. लग्न समारंभ मोठय़ा प्रमाणात सुरु असून पिक पाणी चांगले आल्याने ग्रामीण भागामध्ये वाहनांची मागणी वाढली आहे. यानेच वाहन विक्रीत नोव्हेंबर महिना सुखावला आहे.