छत्तीसगडच्या एका समुदायातील अजब परंपरा
छत्तीसगडच्या कोरबा जिल्हय़ातील सोहापूर गावाला सर्पलोक म्हटले जाते. तेथे राहणाऱया सवरा समाजात एक अनोखी परंपरा कायम आहे. परिवारात मुलीच्या विवाहावेळी वरदक्षिणेच्या स्वरुपात 21 साप देण्याची परंपरा आहे. या परंपरेचे पालन केल्यास सासरी संपन्नता येत असल्याचे मानले जाते.
सवरा समाज जंगलांमधून विषारी साप पकडून आणतात. विष काढून घेत या सापांना पेटीत बंद करून घरोघरी सापांचे दर्शन करवत दोनवेळच्या जेवणाची व्यवस्था करत असतात. यामुळे कोरबा जिल्हय़ात सापांची संख्या पूर्वीपेक्षाही वाढली आहे.
वन्यजीव संरक्षण कायदा आणि वनविभागाच्या कठोर धोरणांमुळे साप दाखवून स्वतःचे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱया सवरा समाजाचे लोक त्रस्त आहेत. अनेकदा वन विभागाकडून कारवाई करत सापांची मुक्तता करण्यात येत आहे. अशा स्थितीत 21 साप विवाहावेळी देण्याच्या परंपरेत बदल होत हा आकडा 11 करण्यात आला आहे.
कोरबा जिल्हय़ात दररोज कुणाच्या न कुणाच्या घरात साप मिळत असल्याच्या घटना समोर येत असतात. अनेकदा सर्पदंशावर वेळीच उपचार न करविल्याने लोकांचा जीव देखील जातआहे. अशा स्थितीत या सवरा समाजाच्या लोकांची सेवाही घेतली जाते. हा समाज अनेकदा सापांना पकडून स्वतःचा उदरनिर्वाह करतात. परंतु शासकीय सुविधांचा लाभ न मिळाल्याने त्यांच्या अडचणी कायम आहेत.
शासकीय मदतीच्या स्वरुपात रेशनकार्ड असून धान्यही मिळते. परंतु लोकांकडे कुठलीच जमीन-मालमत्ता नसल्याने समाजाच्या कुठल्याही सदस्याचे आजपर्यंत जात प्रमाणपत्र तयार करता आले नसल्याचे एका ग्रामस्थाने सांगितले आहे. कोरबा जिल्हय़ातील सोहागपूर गाव सर्पलोक म्हणून प्रसिद्ध असले तरीही वन विभागाचे कठोर धोरण आणि जात प्रमाणपत्र नसल्याने सवरा समाजाच्या लोकांना शासकीय लाभांपासून वंचित रहावे लागत आहे.