लहानपणीच मोलमजुरीसाठी घराबाहेर पडलेल्या आणि बारा वर्षे सिमेंटच्या पाईपमध्ये वास्तव्य केलेल्या नरेशकुमार नामक व्यक्तीला 22 वर्षांनंतर आपल्या कुटुंबाशी परत जोडले जाण्याचे भाग्य लाभले आहे. वयाच्या सातव्या वषीच तो घराबाहेर पडला होता. अनेक ठिकाणी त्याने मोलमजुरी केली. झारखंडमधील एका ठेकेदाराचे काम त्याने अनेक वर्षे केले. नंतर ठेकेदाराने त्याला बाहेर काढले. त्यानंतर तो दहा-बारा वर्षे रस्त्याकडेला टाकलेल्या सिमेंटच्या मोठय़ा पाईपमध्ये रहात होता. मिळेल ते काम करणे आणि पोट भरणे हेच त्याचे जीवनध्येय होते. आपल्या घरचा पत्ताही तो या कालावधीत विसरला होता. पण त्याला कुटुंबीयांना भेटण्याची अनावर ओढही होती. अखेरीस काही स्वयंसेवकांच्या मदतीने त्याला आपले कुटुंब परत सापडले आहे. त्यानंतर जवळपास 22 वर्षांनी तो काही दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबीयांना भेटला. आपली 22 वर्षांची कर्मकहाणी त्याने नंतर काही पत्रकारांना सांगितली. त्यामुळे या घटनेला प्रसिद्धी मिळाली. काम मिळत नसे तेव्हा त्याला पोटासाठी भीकही मागावी लागली होती. गेली दोन वर्षे तो आजारी होता. त्याचवेळी त्याला काही स्वयंसेवकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. त्याची अधिक माहिती घेऊन त्यांनी त्याचे कुटुंबीय शोधून काढले आणि नंतर त्यांचे मिलन घडवून आणले. त्याची आई आणि वडील यांना तो पुन्हा मिळेल याची खात्री नव्हती. परमेश्वराची कृपा म्हणूनच मुलगा परत मिळाला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
22 वर्षांनी कुटुंबाशी मिलन
Advertisements