साडेतीन महिन्यांचा करार : बायजूज, यूएन अकादमीवर मात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फॅन्टसी गेमिंग प्लॅटफॉर्म ड्रीम 11 ने मंगळवारी आयपीएल प्रायोजकत्वावर आपली मोहोर उमटवली. साडेतीन महिन्यांच्या करारासाठी या कंपनीने 222 कोटी रुपयांची किंमत मोजली. आयपीएल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी वृत्तसंस्थेला ही माहिती दिली.
मुख्य प्रायोजकत्वासाठी व्हिवो या चिनी कंपनीशी असलेला करार रद्द केल्यानंतर बीसीसीआयने यंदाच्या आवृत्तीसाठी प्रस्ताव मागवले. त्यात ड्रीम 11 कंपनीने बायजूज (201 कोटी), यूएन अकादमी (170 कोटी) या शिक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांवर मात केली.
भारत-चीन सीमारेषेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर व्हिवो व बीसीसीआय यांच्यातील दरवर्षी 440 कोटी रुपयांचा करार यंदा रद्द करण्यात आला.
त्यानंतर बीसीसीआयला नव्या प्रायोजकांचा शोध होता. यंदाची आयपीएल स्पर्धा दि. 19 सप्टेंबर रोजी संयुक्त अरब अमिरातमध्ये होणार आहे. कोव्हिड-19 च्या अस्मानी संकटामुळे ही स्पर्धा यंदा भारताबाहेर हलवली गेली
आहे.
ड्रीम 11 ही भारतीय कंपनी असून हर्ष जैन व भवित शेठ यांनी त्याची स्थापना केली असल्याचे बीसीसीआय सूत्रानी येथे स्पष्ट केले.
बीसीसीआयने अल्प कालावधीत यंदाच्या आयपीएल आवृत्तीसाठी प्रायोजक शोधला. पण, ड्रीम 11 कंपनीकडून येणारी रक्कम ही मूळ प्रायोजक व्हिवो कंपनीकडून येणाऱया रकमेपेक्षा बरीच कमी असल्याचे या करारावरुन स्पष्ट झाले आहे.
तरीही चायनीज कनेक्शन कायम राहणार?
बीसीसीआयने व्हिवो कंपनीशी करार रद्द करत अल्प कालावधीत नुकसान सोसत नवा प्रायोजक शोधला आहे. पण, ड्रीम 11 या नव्या प्रायोजक कंपनीत देखील चायनीज गुंतवणूक असल्याने आयपीएलचे मुख्य प्रायोजक व चायनीज कनेक्शन कायम राहणार का, असा प्रश्न काही माध्यमांनी उपस्थित केला. चायनीज इंटरनेट जायंट टेन्सेंन्ट होल्डिंग्ज लिमिटेड या कंपनीची ड्रीम 11 मध्ये गुंतवणूक आहे. पण, ती 10 टक्के पेक्षाही कमी असल्याचा दावा बीसीसीआयमधील एका सूत्राने केला आहे.