वेळापत्रक जाहीर; चार टप्प्यात आयोजन
नवी दिल्ली : आयआयटीसह इतर काही केंद्रीय संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात ‘जेईई मेन’ वर्षभरात चार सत्रात घेतली जाणार आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात टप्प्याटप्प्याने ही परीक्षा घेतली जाणार आहे. पहिले सत्र दि. 23 ते 26 फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. परीक्षेनंतर 4 ते 5 दिवसात निकाल जाहीर होईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी बुधवारी दिली. तसेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या तीन विषयांना अनुसरून एकूण 90 प्रश्न विचारले जाणार असून त्यापैकी 75 प्रश्नांची (प्रत्येक विषयाची 25 याप्रमाणे) उत्तरे द्यावी लागणार आहेत.
कोरोनामुळे शैक्षणिक वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. केंद्र व राज्य सरकारांकडून घेण्यात येणाऱया विविध प्रवेश परीक्षांचाही खोळंबा झाला होता. मात्र, नव्या वर्षात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जेईई मेन्स परीक्षेसाठी वेळापत्रक निश्चित करत चार टप्पेही निर्धारित केले. परीक्षेच्या अखेरच्या तारखेनंतर चार ते पाच दिवसात निकाल प्रसिद्ध केला जाणार असल्याचे रमेश पोखरियाल निशांक यांनी सांगितले.