कमीत कमी मुले हा अलिकडच्या स्त्रियांचा आग्रह आहे. अधिक मुले जन्माला घालणे म्हणजे स्वतःच्या ‘करियर’चा नाश करून घेणे अशी अनेक महिलांची समजूत असते. माणसांची अपरंपार वाढलेली संख्या हे देखील या संकल्पनेचे एक महत्वाचे कारण आहे हे खरेच. तथापि, रशियातील ख्रिस्टीना ओजटर्क या महिलेला तसे वाटत नाही. तिला लहान मुलांचा अत्यंत लळा आहे. इतका, की वयाच्या अवघ्या 23 वर्षापर्यंत तिच्याकडे 11 अपत्यांचे मातृत्व आहे. एवढेच नाही, तर 100 अपत्यांचा परिवार करण्याची तिची इच्छा आहे. तिची महत्वाकांक्षा पूर्ण झाली तर, ती 21 व्या शतकातील ‘गांधारी’ होईल यात शंका नाही.
अर्थात, हा केवळ तिचा आणि तिच्या पतीचा पराक्रम नाही. ही विज्ञानाची करामतही आहे. ही सर्व 11 अपत्ये तिच्या ‘पोटा’तून जन्माला आलेली नाहीत. तर ती आणि तिचा पती यांच्या बीजांचे गर्भाशयबाहय़ फलन करून तो गर्भ अन्य महिलांच्या गर्भाशयात वाढविला गेला आहे. याचाच अर्थ असा की टेस्ट टय़ूब बेबी पद्धतीने (सरोगसी) यापैकी 10 अपत्यांचा जन्म झाला आहे. तथापि, जनुकीयदृष्टय़ा ही या दोघांचीच अपत्ये आहेत. त्यामुळे तेच त्यांचे मातापिता आहेत.
आता यात या दोघांचे ‘श्रम’ ते काय असा प्रश्न आपल्या मनात येईल. एका दृष्टीने पाहता तो योग्यही आहे. कारण या 11 अपत्यांपैकी केवळ एक रूढार्थाने तिच्या पोटी जन्माला आले आहे. ऊर्वरित अर्भकांच्या मातृवेणा तिने सहन केलेल्या नाहीत. मात्र या सर्व अर्भकांचा सांभाळ ती आणि तिचा पतीच करतात. हे उत्तरदायित्वही वाटते तितके सोपे नाही, होय ना ?