ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अनेकदा डेडलाईन्स वाढवल्यानंतर अखेर आजपासून देशभरात सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग बंधनकारक करण्यात आले आहे. आजपासून ज्वेलर्सना फक्त 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याचे दागिने विकता येणार आहेत. त्यामुळे 24 कॅरेट सोने आजपासून इतिहासजमा होणार आहे.
हॉलमार्क हे सोन्याच्या शुद्धतेचे मानक आहे. याअंतर्गत प्रत्येक सोन्याच्या दागिन्यावर किंवा कलाकृतीवर भारतीय मानक ब्युरो (BIS) आपल्या मार्कद्वारे शुद्धतेची ओळख देते. सराफांकडून 22 कॅरेटसाठी 916, 18 कॅरेटसाठी 750 तर 14 कॅरेटसाठी 585 हा हॉलमार्किंग क्रमांक निश्चित करण्यात आला आहे.
आजपासून हॉलमार्क नसलेले किंवा विनापरवाना सोन्याचे दागिने विकणाऱ्यांवर बीआयएसच्या नियमानुसार कारवाई होणार आहे. या कारवाईअंतर्गत सराफांविरोधात मालाची जप्ती, पाच लाख रुपयांपर्यंत दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.