कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत अध्यक्षांकडून मुद्दा उपस्थित : पाणी योजनेत कॅन्टोन्मेंटचाही समावेश करण्याची सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात 24 तास पाणीपुरवठा करण्याकरिता जलवाहिनी घालण्यासाठी परवानगी हवी, पण या योजनेत कॅन्टोन्मेंट बोर्डचा समावेश का केला नाही? असा मुद्दा कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला. कॅन्टोन्मेंट हद्दीमधून जलवाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यास परवानगी देऊ, मात्र या योजनेत कॅन्टोन्मेंटचाही समावेश करा, अशी सूचना बैठकीत केली.तसेच पुढील बैठकीच्या अजेंडय़ावर 24 तास पाणीपुरवठय़ाचा विषय घेण्याचा निर्णय घेतला.
कॅन्टोन्मेंट बोर्डची सर्वसाधारण सभा ब्रिगेडिअर रोहित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. कॅन्टोन्मेंट हद्दीमधून जाणाऱया जलवाहिन्या घालण्यासाठी परवानगी देण्याची मागणी एल ऍण्ड टी कंपनीने कॅन्टोन्मेंटकडे केली होती. त्यामुळे हा विषय मुख्य अजेंडय़ावर घेण्याऐवजी पुरवणी विषयपत्रिकेद्वारे बैठकीत चर्चेस घेण्यात आला.
शहरात 24 तास पाणीपुरवठा योजना राबवित आहेत, ही बाब चांगली आहे. पण या योजनेत कॅन्टोन्मेंट बोर्डचा समावेश का करण्यात आला नाही? असा मुद्दा अध्यक्ष ब्रिगेडिअर चौधरी यांनी उपस्थित केला. याबाबत एल ऍण्ड टी कंपनी व जिल्हाधिकाऱयांशी चर्चा करण्याची सूचना सीईओंना केली. जलवाहिन्या घालण्यास परवानगी देण्यास काहीच हरकत नाही. पण योजनेत कॅन्टोन्मेंटचा समावेश केल्यानंतरच, असा प्रस्ताव अध्यक्षांनी मांडला. तसेच पाणीपुरवठा मंडळाचे पाण्याचे बिल थकले आहे. त्यामुळे पाणीपट्टीत वाढ केल्याशिवाय पर्याय नाही. पाणीपट्टी वाढ करण्याच्यादृष्टीने अभ्यास करण्यात यावा, तसेच चर्चा करण्यासाठी हा विषय पुढील बैठकीच्या अजेंडय़ावर घेण्याची सूचना केली.
तसेच कॅन्टोन्मेंट परिसरातील रस्ते सुस्थितीत असून जलवाहिन्या घालण्यासाठी खोदाई केल्यास चांगले रस्ते खराब होण्याची शक्मयता आहे. तसेच काही ठिकाणी फुटपाथ खराब झाले असून याठिकाणी जलवाहिन्या घालण्यास काहीच हरकत नाही. तसेच जलवाहिन्या घातल्यानंतर फुटपाथची दुरुस्ती होईल, असे अध्यक्ष ब्रिगेडिअर रोहित चौधरी यांनी सांगितले. त्यामुळे याबाबत एल ऍण्ड टी कंपनीच्या अधिकाऱयांशी चर्चा करण्याची सूचना केल्या.
विविध विषयांना मंजुरी
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हद्दीतील थिम्मय्या रोडवर वाहने पार्क करण्यात येत असल्याने रहदारीस अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे थिम्मय्या रोडशेजारी ठिकठिकाणी नो पार्किंग फलक लावण्याची सूचना कॅन्टोन्मेंटच्या अभियंत्यांना केली. त्याचप्रमाणे स्वतंत्रता मार्ग आणि आसदखान दर्गा परिसरातील रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांना त्रास होत आहे. तसेच थिम्मय्या रोडवर वाहनांची वर्दळ वाढत आहे. त्यामुळे रस्त्याचे डांबरीकरण तातडीने करण्याचा आदेश बजावला. पोस्ट खात्याने 1 कोटी 1 लाख 72 हजारपैकी 77 लाख 81 हजार रुपये सर्व्हिस टॅक्स जमा केले आहे. उर्वरित रक्कम जमा करण्यासाठी अवधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. विषयपत्रिकेवरील विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. यावेळी सरकार नियुक्त सदस्य सुधीर तुपेकर यांनीदेखील विषयवार मुद्दे उपस्थित करून सूचना मांडल्या.