वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशातील जवळपास 25 लाख लहान आणि मध्यम व्यवसायांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणण्यास मदत केली असल्याचा दावा गुरूवारी ऍमेझॉन कंपनीने केला आहे. सदर व्यापाऱयांच्या मदतीने जवळपास तीन अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचे ध्येय प्राप्त करण्यास मदत होणार असल्याचा विश्वासही कंपनीने यावेळी व्यक्त केला आहे.
या नवीन योजनेच्या कार्यामुळे आगामी काळात लाखांच्या पटीने रोजगार तयार होणार असल्याचेही संकेत आहेत. ऍमेझॉनने मागील वर्षात एक कोटी सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) डिजिटल पातळीवर सक्षम करण्यासाठी एक अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. याच्या आधारेच 2025 पर्यंत 10 अब्ज अमेरिकन डॉलरची निर्यात प्राप्त करण्यासह 10 लाख लोकांसाठी अतिरिक्त रोजगार देण्याचे ध्येय निश्चित केले असल्याचेही यावेळी स्पष्ट केले होते.
विक्रेते 50 टक्क्यांनी अधिक जानेवारी 2020 नंतर जवळपास 25 लाखापेक्षा अधिक नवीन विक्रेते ऑनलाईन आले असून ते ऍमेझॉनवर कार्यरत राहिले आहेत. विक्रेत्यांचा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर येण्याचा दर हा कोविड पूर्वच्या तुलनेत 50 टक्क्यांनी अधिक राहिला असल्याची माहिती ऍमेझॉन इंडियाचे कंट्री हेड आणि जागतिक वरिष्ठ उपाध्यक्ष अमित अग्रवाल यांनी दिली आहे. सदरच्या प्लॅटफॉर्मवर जवळपास एक तृतियांश विक्रेते हे स्थानिक भाषांचा वापर करत आहेत.