मलकापूर पालिकेच्या कारभारावर विरोधकांची टिका, नागरिकांमधूनही नाराजी
प्रतिनिधी / कराड
मलकापूर शहरात रस्त्याची कामे वेगाने सुरू आहेत. यातच भारत मोटर्स शेजारील रस्त्याचे काम अनेक वर्षांच्या मागणीनंतर पुर्ण झाले मात्र नव्याने झालेल्या रस्त्यात भुयारी गटर योजनेचे चेंबर व लिकेज शोधण्यासाठी खड्डा काढण्यात आला. नव्याने तयार केलेला रस्ता खोदल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्त करत नगरपरिषदेच्या कारभारावर टिका केली आहे.
मलकापूर शहरात विविध कॉलन्यांमधील रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण व काँक्रिटीकरणाची कामे युध्दपातळीवर सुरू आहेत. 15 दिवसांपुर्वी भारत मोटर्स आणि मारुती शोरुम यांच्यामधून जाणारा नवीन रस्ता तयार केला होता. या रस्त्यासाठी अनेक घडामोडी घडल्या होत्या. तेथील स्थानिक नागरिकांनी वारंवार पाठपुरावा करून रस्त्यासाठी प्रयत्न केले होते. त्यानंतर पंचवीस वर्षात पहिल्यांदाच या रस्त्याचे डांबरीकरण केले. काम झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असतानाच रस्त्यावर भूमिगत गटर योजनेचे चेंबर शोधण्यासाठी पुन्हा रस्ता उकरला आहे. सांडपाणी योजनेचे लिकेज व चेंबर शोधण्यासाठी रस्ता उकरायचाच होता तर डांबरीकरण करण्यापूर्वी हे काम करणे अपेक्षित होते असा आरोप विरोधकांकडून होत आहे.
विरोधी पक्षनेते अजित थोरात म्हणाले लाखो रुपये खर्चुन केलेले रस्ते राजरोसपणे का उकरले जातात? असा सवाल मलकापूर वासियांनी उपस्थित केला आहे. विरोधकांनी मांडलेल्या चांगल्या सूचनांचा ही सकारात्मक विचार केला जात नाही ही आमची खंत आहे. प्रशांत गावडे म्हणाले, नागरिकांच्या पाठपुराव्यामुळे 25 वर्षांनी पहिल्यांदाच हा रस्ता तयार झाला होता. मात्र गटरच्या नावाखाली हा रस्ता पुन्हा उकरला. असे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत.
खोदलेला रस्ता बुजवण्याचे काम सुरू सांडपाणी प्रक्रिया योजनेच्या कामाचे चेंबर शोधण्यासाठी नविन रस्त्यात खड्डा काढला होता. तो शनिवारी सायंकाळी पुन्हा बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले होते. खड्डय़ावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्यावर पालिकेचे अधिकारी यांनी तेथील पाहणी केली.