निधी मंजूर करण्यासाठी वित्त आयोगाला मुख्यमंत्र्यांच्या सूचना
प्रतिनिधी /खानापूर
तालुक्यातील खानापूर-लिंगनमठ तसेच खानापूर-अनमोड रस्त्याच्या विकासासाठी तालुक्याच्या आमदार अंजली निंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांची मंगळवारी बेंगलोर येथील कार्यालयात भेट घेऊन 25 कोटी अनुदान मंजूर करण्याची मागणी केली. याबाबत मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी तात्काळ सकारात्मक निर्णय घेऊन वित्त आयोगाला याबाबत निधी मंजूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खानापूर-अनमोड या रस्त्यावरील खानापूर तालुक्याच्या हद्दीपर्यंत रस्ता दुरुस्त करण्यात येणार तसेच खानापूर-हल्याळ या रस्ता लिंगनमठपर्यंत करण्यात येणार असल्याचे तालुक्याच्या आमदार निंबाळकर यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले.
खानापूर-लिंगनमठ हा रस्ता पूर्णपणे खराब झाला असल्याने या रस्त्यावरुन वाहतूक करणे जिकरीचे बनले आहे. याबाबत तालुक्यातील जनतेनी रस्ता दुरुस्तीची वारंवार मागणी केली होती. याची दखल घेऊन आमदार अंजली निंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली. तसेच खानापूर-अनमोड व्हाया हेम्माडगा या रस्त्याचीही गेल्या दोनवर्षापासून वाताहत झाली होती. या रस्त्यावरुन गोवा राज्यासाठी नजीकचा रस्ता म्हणून मोठय़ा प्रमाणात वाहतूक होत होती. खानापूर-रामनगर हा रस्ता नव्याने करण्यात येत असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होता. त्यामुळे खानापूर-हेम्माडगा रस्त्यावरुन गोव्याला मोठय़ा प्रमाणात अवजड वाहतूक होत होती. त्यामुळे हा रस्ता खराब झाला होता. या भागातील 50 खेडय़ांचा संपर्क रस्ताच उदध्वस्त झाल्याने अनेक समस्या निर्माण झाला होता. तसेंच गोव्यासाठी होणारी खासगी वाहतुकीवरही परिणाम झाला होता. त्यामुळे हा रस्ता तात्काळ करण्याची मागणी होत होती.
या दोन्ही रस्त्यांचा गांभीर्याने विचार करुन आमदार अंजली निंबाळकर यांनी मंगळवारी बेंगलोर येथें मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात भेट घेऊन दोन्ही रस्त्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. व तातडीने हा रस्ता होणे आवश्यक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्याशी अनमोड रस्त्यासंदर्भात चर्चा केल्याचे स्पष्ठ केले. आणि वित्त आयोगाला या दोन्ही रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनुदान मंजूर करण्याच्या सूचना केल्या.