पदवीधर मतदारसंघासाठी 99 हजार 578 मतदार : 13 जूनला मतदान
प्रतिनिधी /बेळगाव
वायव्य शिक्षक व पदवीधर तसेच कर्नाटक पश्चिम संघाच्या निवडणुकीची संपूर्ण तयारी झाली आहे. 13 जून रोजी मतदान होणार आहे तर 15 जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी अंतिम यादी जिल्हाधिकाऱयांनी जाहीर केली असून कर्नाटक वायव्य शिक्षक मतदारसंघासाठी 25 हजार 388 मतदार आहेत. तर कर्नाटक वायव्य पदवीधर संघासाठी 99 हजार 578 मतदार आहेत. याचबरोबर कर्नाटक पश्चिम शिक्षक संघासाठी 17 हजार 973 मतदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कर्नाटक पश्चिम शिक्षक आणि कर्नाटक वायव्य पदवीधर व शिक्षक संघासाठी निवडणूक होत आहे. 19 मे पासून अर्ज दाखल केले होते. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात वायव्य पदवीधर आणि वायव्य शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले. 26 मे अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. अर्ज छाननी 27 मे रोजी करण्यात आली होती. त्यानंतर 30 मे रोजी काहीजणांनी अर्ज माघार घेतली होती. कर्नाटक वायव्य शिक्षक मतदारसंघासाठी 12 जण रिंगणात आहेत तर कर्नाटक वायव्य पदवीधर संघासाठी 11 जण रिंगणात आहेत. त्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे.
13 जून रोजी मतदान होणार असून सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत मतदानासाठी वेळ देण्यात आला आहे. यासाठी एकूण 78 मतदान केंदे स्थापन करण्यात आली असून चार अतिरिक्त केंदेही स्थापन करण्यात येणार आहे. 15 जून रोजी मतमोजणी होणार आहे.
मतदारसंघाचे नाव | पुरूष | महिला | इतर | एकूण |
कर्नाटक वायव्य शिक्षक मतदारसंघ | 17238 | 8150 | 0 | 25388 |
कर्नाटक वायव्य पदवीधर मतदारसंघ | 71040 | 28554 | 4 | 99598 |
पश्चिम शिक्षक मतदारसंघ | 10983 | 6990 | 0 | 17973 |
कोरोनाचे नियम पाळत मतदान, मतमोजणी
कोरोनाबाबतची सर्व मार्गसूची पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पूर्वी प्रमाणे कोरोनाचे सर्व नियम पाळून मतदान करणे तसेच मतमोजणीच्या ठिकाणीही त्याचे नियम पाळावेत, अशी सक्त ताकीद निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱयांनी कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.