आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्या चेहऱयाची देखभाल करणे कित्येकांना जमत नाही. त्यासाठी वेळ काढता येणे कठीण होत आहे. बाजारात हजारोंच्या संख्येने सौंदर्यप्रसाधने उपलब्ध आहेत. तथापि, त्यांचा प्रभाव दीर्घकाळ राहात नाही. तसेच अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये रासायनिक पदार्थांचे प्रमाण अधिक असल्याने त्यांच्या अतिवापराने चेहऱयावरील नैसर्गिक तेज आणि जिवंतपणा प्रभावित होतो.
ही अडचण लक्षात घेऊन पुण्यातील मोहिनी पटवा नामक युवतीने होममेड आणि हँडमेड स्कीनकेअर उत्पादने तयार केली आहेत. अवघ्या 25 हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर सुरू करण्यात आलेला हा व्यवसाय आता वार्षिक दहा लाखांच्या उलाढालीपर्यंत पोहोचला आहे. प्रॉडक्ट्स बाय मोहिनी या नावाने तिचे ब्रँड्स ओळखले जात आहेत. त्या स्वतःची उत्पादने स्वतःच्या देखरेखीखाली तयार करून घेतात. त्यामुळे गुणवत्तेमध्ये सातत्य राहते, असे त्यांचे म्हणणे आहे.
कोणत्याही उत्पादनामध्ये रासायनिक पदार्थ वापरले जात नाहीत. केवळ नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेल्या पदार्थांवरच घरगुती सौम्य प्रक्रिया करून ही उत्पादने बनविली जातात. नैसर्गिक तेलाचा आणि स्निग्ध पदार्थांचा उपयोग केला जातो. शाम्पू, लोशन, क्रीम, साबण, स्क्रब, फेसवॉश अशी 155 हँडमेड उत्पादने त्या तयार करतात. त्यांची विक्री देशभरात ऑनलाईन आणि ऑफलाईन मार्केटच्या माध्यमातून होत आहे. भोपाळमध्ये जन्मलेल्या मोहिनी यांनी ‘वित्त’ या विषयात मास्टर्स डिग्री मिळविली आहे. 2019 मध्ये विवाह झाल्यानंतर त्यांनी व्यवसाय सुरू केला. पाहता पाहता तो दशलक्ष उलाढालीपर्यंत पोहोचला. 2020 मध्ये त्यांनी आपली कंपनी नोंदणीकृत केली. त्यानंतर व्यवसाय अधिक वाढला. आज त्यांच्या उत्पादनांना वाढता प्रतिसाद सर्वत्र मिळत आहे.