अमेरिकेच्या हवाई पोलिसांनी एका दांपत्याला नुकतीच अटक केली आहे. या दोघांवरही हेरगिरी करणे आणि सरकारविरोधात कटकारस्थान करण्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. या दांपत्याचे लागेबांधे रशियाच्या केजीबी या गुप्तहेर संस्थेशी जोडले जात आहेत. गुप्तहेरगिरी वास्तविक नवी नाही. तथापि, या दांपत्याने तब्बल 25 वर्षे अमेरिकेत बनावट ओळखपत्रावर काढली आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षा यंत्रणेच्या क्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अमेरिकेचे संरक्षण साधनांचे कंत्राटदार वॉल्टर प्रिमरोज आणि त्यांची पत्नी ग्वीन मॉरिसन यांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून अनेक धक्कादायक आणि आश्चर्यकारक बाबींचा खुलासा झाला आहे. मृत मुलांचे नाव आणि ओळखपत्र वापरून हे दांपत्य अमेरिकेत सुखनैव संचार करीत होते. त्यांच्या घराच्या झडतीत अशी काही ओळखपत्रे सापडली आहेत.
वॉल्टर आणि त्याची पत्नी हे देशासाठी मोठा धोका आहेत, अशी टिप्पणी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील एका न्यायाधीशाने केल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य साऱयांच्या लक्षात आले. अमेरिकेत दोन किंवा त्यापेक्षा कमी व्यक्तींनी केलेली ही सर्वात प्रदीर्घ काळ चाललेली गुप्तहेरगिरी असल्याचे बोलले जात आहे. आता या गुप्तहेरगिरीचा पर्दाफाश झालेला असला तरी आतापर्यंत त्यांनी कोठे आणि किती हानी पोहोचविली आहे? हे शोधण्यासाठी अनेक वर्षे जातील, अशी शक्मयता आहे. रशियाच्या गुप्तहेर विभागाने अमेरिकेत किती खोलवर पाळेमुळे रुजविली आहेत, याचे प्रत्यंतर या प्रकरणातून येते, असे अमेरिकेच्या एफबीआय या संस्थेच्या माजी अधिकाऱयांनी म्हटले आहे.