क्षेत्रवाढीसाठी शेतकऱयांना मार्गदर्शन : बागायत खात्याचे प्रयत्न : फळबागायतदारांना प्रोत्साहन, रोपांचे मोफत वाटप
प्रतिनिधी / बेळगाव
पामतेलाच्या उत्पादनात वाढ व्हावी, याकरिता बागायत खात्यामार्फत प्रयत्न सुरू आहेत. जिल्हय़ात विविध ठिकाणी शेताच्या बांधावर शिबिरे आयोजित करून पामतेलाविषयी शेतकऱयांना मार्गदर्शन केले जात आहे. सध्या जिल्हय़ात 314 हेक्टर क्षेत्रात पामतेलाच्या झाडांची लागवड झाली असली तरी येत्या पाच वर्षात तब्बल 2500 हेक्टरात लागवडीचे उद्दिष्ट खात्याने ठेवले आहे. त्यामुळे भविष्यात पामतेल फळ पीक म्हणून पुढे येईल, अशी आशा बागायत खात्याला आहे.
जिल्हय़ातील रामदुर्ग, खानापूर, गोकाक, बैलहोंगल, चिकोडी यासह इतर तालुक्मयातदेखील पामतेलाच्या झाडांची लागवड झाली आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे पीक असल्याने शेतकऱयांनी पामतेलाच्या शेतीकडे वळावे, असे आवाहनदेखील खात्याने केले आहे. एकदा लागवड झाल्यानंतर साधारण 30 ते 35 वर्षे उत्पादन होऊ शकते. शिवाय खात्यामार्फत मोफत रोपे पुरविली जातात. शेतकऱयांनी पाम लागवडीसाठी आणि इतर अधिक माहितीसाठी जवळच्या बागायत कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
बागायत खात्यामार्फत फळबाग क्षेत्र वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे अलीकडे कलिंगड, चिंच, आंबा, नारळ, डाळिंब, पेरू, लिंबू, द्राक्षे, सीताफळ, शेवगा, फणस आदी फळांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. त्याबरोबर आता पाम शेती करण्यासाठीदेखील खात्यामार्फत मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले जात आहे. दैनंदिन वापरल्या जाणाऱया खाद्यतेल, बिस्कीट, दुग्धजन्य पदार्थ, चॉकलेट, पॅकिंग केलेले तळलेले पदार्थ, टूथपेस्ट, सौंदर्य प्रसाधने, साफ-सफाईची उत्पादने, बायोडिझेल यासारख्या वस्तूंमध्ये पामतेलाचा वापर वाढला आहे. इतर वनस्पती तेलापेक्षा पामतेल स्वस्त असल्याने खरेदी करण्याकडे कल वाढला आहे.
प्रतीटनाला 12,500 रु. हमीभाव जाहीर शासनाकडून प्रतीटनाला 12,500 रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आर्थिकदृष्टय़ा पामतेल शेती फायदेशीर आहे. साधारण एका एकरात 4 वर्षात तब्बल 10 टन उत्पादन होऊ शकते. शिवाय रासायनिक खत, कीटकनाशकांची आवश्यकता भासत नाही.