इक्विटी फंडांमध्ये ग्राहकांचा रस अधिक : युद्धावर साऱयांचे लक्ष केंद्रीत
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
शेअर बाजारामध्ये सध्या चढ-उताराचा सिलसिला कायम असून विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी विक्रीवर जोर दिला आहे. इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणुकीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभतो आहे, असे दिसून आले आहे. मार्चमधील गुंतवणूकीची आकडेवारी समोर आली असून 28 हजार कोटीहून अधिकची रक्कम इक्विटीत झाली आहे.
शेअर बाजारात सध्या युक्रेन-रशिया युद्धाचे परिणाम जाणवत असून त्यावर बाजाराची दिशा ठरते आहे. सध्याला या परिस्थितीत कोणतीही सुधारणा नसल्याने शेअर बाजाराला तेजीचा सूर कायम ठेवणे अशक्य होताना दिसते आहे.
मार्चमधील गुंतवणूक सर्वाधिक
गेल्या मार्च महिन्यामध्ये इक्विटी फंडांमध्ये 28 हजार 463 कोटी रुपयांची शुद्ध स्वरूपाची गुंतवणूक झाली आहे. हा आत्तापर्यंतचा गुंतवणूकीचा सर्वाधिक विक्रम असल्याचेही सांगितले जात आहे. याआधी डिसेंबर महिन्यामध्ये 24 हजार 989 कोटी रुपयांची शुद्ध गुंतवणूक इक्विटी फंडांमध्ये झाली आहे.
44 टक्के गुंतवणूक अधिक
फेब्रुवारी महिन्यामध्ये 19 हजार 705 कोटी रुपयांची गुंतवणूक इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये झाली होती. फेब्रुवारीच्या तुलनेमध्ये मार्चमध्ये इक्वीटी फंडातील गुंतवणूक ही 44 टक्के अधिक स्वरूपात दिसली आहे. यामध्ये एसबीआय मल्टी कॅप फंडाच्या न्यू फंड ऑफरमध्ये 8 हजार 170 कोटी रुपयांची गुंतवणूक आली असल्याची माहिती आहे.