ऑनलाईन टीम / तरुण भारत :
290 bogus doctors in Dhule धुळ्यात मुन्नाभाई डॉक्टरांचा सुळसुळाट सुरू आहे. जिल्ह्यात तब्बल 290 बोगस डॉक्टर असून, त्याची यादी आरोग्य विभागाकडे आहे. तरीदेखील मागील 9 महिन्यात केवळ 8 बोगस डॉक्टरांवरच कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे इतर बोगस डॉक्टरांवर कारवाई कधी? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
गोरगरिब जनतेच्या भाबडेपणाचा फायदा घेत कोणताही वैद्यकीय परवाना नसताना तब्बल 290 मुन्नाभाई धुळ्यात दवाखाना थाटून बसले आहेत. या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरीय पुनर्विलोकन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडे जिल्ह्यातील या बोगस डॉक्टरांची यादी आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने याबाबतची माहिती समितीचे सदस्य सचिव तथा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस निरीक्षकांकडे पाठवली आहे. मात्र, आतापर्यंत केवळ 8 जणांवरच कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या समितीच्या बैठकाही वेळेवर होत नाहीत.
अधिक वाचा : सुषमा अंधारेंचे पती करणार शिंदे गटात प्रवेश
जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी त्यांची यादी जाहीर करावी असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र, अद्यापही ही यादी प्रसिद्ध झाली नसल्याचे सांगण्यात येते.