Tarun Bharat

3 ते 4 टप्प्यांमध्ये बिहारची निवडणूक शक्य

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा आता कुठल्याही दिवशी होऊ शकते. निवडणूक आयोगाचे 2 सदस्यीय पथक सद्यकाळात बिहार दौऱयावर आहे. निवडणूक आयोगाचे हे पथक बिहारच्या विविध भागांमध्ये जाऊन स्थितीचा आढावा घेत आहे. हे पथक राज्याच्या सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षकांसोबत समीक्षा बैठक करत आहे. तर मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे.

भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, बिहारचे प्रभारी भूपेंद्र यादव आणि निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी 3 दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेत चर्चा केली आहे. रालोआत जागावाटपावरून सहमती झाल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व घडामोडींमधून चालू आठवडय़ातच बिहार विधानसभा निवडणुकीसाठी तारखांची घोषणा केली जाण्याचे संकेत मिळत आहेत. कोरोना काळात यंदा बिहारची निवडणूक किती टप्प्यात होणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहिले आहे.

निवडणूक आयोगायच पथकाने मंगळवारी भागलपूर येथे 12 जिल्हय़ांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसोबत समीक्षा बैठक घेतली आहे. बांका, मुंगेर, लखीसराय, शेखपुरा, जमुई, खगडिया, बेगूसराय, पूर्णिया, अररिया, किशनगंज आणि कटिहारचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक, अतिरिक्त अधीक्षक यांनी या बैठकीत भाग घेतला आहे. या जिल्हय़ांमध्ये एकाच दिवशी मतदान होण्याची शक्यता आहे.

मंगळवारी दुपारी निवडणूक आयोगाच्या पथकाने बोधगया येथे आढावा बैठक घेतली आहे. बोधगयामध्ये 7 जिल्हय़ांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी बैठकीत सहभाग घेतला आहे. गया, जहानाबाद, अरवल, नवादा, औरंगाबाद, कैमूर आणि रोहतास या 7 जिल्हय़ांमध्ये एकाच दिवशी मतदान घेतले जाऊ शकते.

तत्पूर्वी सोमवारी निवडणूक आयोगाच्या पथकाने मुजफ्फरपूर येथे आढावा बैठक घेतली होती. पथकाने उत्तर बिहारच्या मुजफ्फरपूर, सीतामढी, शिवहर, पश्चिम चंपारण्य, पूर्व चंपारण्य, वैशाली, दरभंगा, मधुबनी, समस्तीपूर, सहरसा, सुपौल आणि मधेपुरा जिल्हय़ातील निवडणूक तयारींची माहिती जाणून घेतली आहे.

Related Stories

ऑगस्टपर्यंत प्रतिदिन 1 कोटी लसी शक्य

Amit Kulkarni

बेहमई प्रकरणी 24 रोजी सुनावणी

Patil_p

केंद्राच्या दबावतंत्राविरोधात एकत्र लढुया!

Patil_p

राजीव गांधींच्या स्वप्नाची मोदी सरकारकडून पूर्तता

Patil_p

रोजंदारी कामगारांना किमान वेतन द्या

Patil_p

केंद्रीय मंत्री कृष्ण पाल गुर्जर यांना कोरोनाची बाधा

Tousif Mujawar