Tarun Bharat

3 सुवर्ण जिंकले, तरी ड्रेसेलची ‘ती’ महत्त्वाकांक्षा अधुरीच!

एकाच ऑलिम्पिकमध्ये 6 सुवर्ण जिंकण्याचा पराक्रम करता येणार नाही, सांघिक गटातील अपयश नडले

अमेरिकेचा कॅलेब डेसेलने आतापर्यंत टोकियो ऑलिम्पिकमध्ये 3 सुवर्णपदके जिंकली आहेत. मात्र, एकाच ऑलिम्पिकमध्ये 6 सुवर्णपदके जिंकण्याचा पराक्रम त्याला यंदा गाजवता येणार नाही, हे शनिवारी स्पष्ट झाले. त्याचा समावेश असलेल्या अमेरिकन संघाला सांघिक गटात पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले, त्यामुळे ड्रेसेलची संधी हुकली. ड्रेसेलचे आणखी 2 इव्हेंट बाकी आहेत. मात्र, हे दोन्ही इव्हेंट जिंकले तरी त्याची या ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकांची संख्या जास्तीत जास्त 5 वर जाऊ शकतील.

एकाच ऑलिम्पिकमध्ये 6 किंवा त्याहून अधिक सुवर्ण जिंकण्याचा पराक्रम अमेरिकेचा दिग्गज जलतरणपटू मायकल फेल्प्सच्या खात्यावर असून त्याने एकदा तर चक्क दोनवेळा असा पराक्रम गाजवला आहे. फेल्प्सने यापूर्वी 2004 ऍथेन्स ऑलिम्पिकमध्ये 6 आणि 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 8 सुवर्ण जिंकले. ड्रेसेलला एकाच ऑलिम्पिकमध्ये 6 सुवर्ण जिंकणारा एकूण चौथा व एकंदरीत पाचवा ऍथलिट बनण्याची संधी होती. मात्र, सांघिक गटातील अपयशामुळे त्याची ही महत्त्वाकांक्षा अधुरीच राहणार, हे निश्चित झाले.

शनिवारी टोकियो ऍक्वेटिक्स सेंटरवर ड्रेसेलने 100 मीटर्स बटरफ्लायचे सुवर्ण जिंकत नवा विश्वविक्रम रचला. त्याने 49.45 सेकंदाची नवी वेळ नोंदवली. याशिवाय, 100 मीटर्स फ्री स्टाईल आणि 4ƒ100 फ्री स्टाईल पुरुष रिलेमध्येही त्याने सुवर्णपदके कमावली. मात्र, 4ƒ100 मिक्स रिलेमध्ये अन्य सहकाऱयांच्या निराशाजनक कामगिरीचा डेसेलला फटका बसला. ड्रेसेल आपल्या शेवटच्या लॅपसाठी पूलमध्ये उतरला, त्यावेळी अमेरिकेचा संघ चक्क 8 सेकंदांनी पिछाडीवर होता आणि ही मोठी पिछाडी भरुन काढणे ड्रेसेलसारख्या जागतिक स्तरावरील अव्वल जलतरणपटूला देखील शक्य नव्हते.

डेसेलच्या आटोकाट प्रयत्नानंतर देखील अमेरिकेचा संघ या इव्हेंटमध्ये पाचव्या स्थानी फेकला गेला. 2 पुरुष व 2 महिला ऍथलिटचा समावेश असलेल्या या मिश्र गटात ब्रिटनने नव्या विश्वविक्रमासह सुवर्ण जिंकले. अमेरिकेला जलतरणात पाचव्या स्थानी समाधान मानावे लागते, हे पचवणे कठीण आहे, अशी प्रतिक्रिया ड्रेसेलने येथे व्यक्त केली.

लेडेकीला यंदा 5 पदके

महिला गटात लेडेकीने मात्र आपला धूमधडाका कायम राखत यंदा 2 सुवर्ण, 2 रौप्य व एकदा पाचवे स्थान मिळवले आणि टोकियो ऑलिम्पिक मोहिमेची यशस्वी सांगता केली. यादरम्यान लेडेकी आपल्या कारकिर्दीत 6 वैयक्तिक सुवर्ण जिंकणारी महिला जलतरणपटू ठरली.

ब्रिटनला विश्वविक्रमासह सुवर्ण

अमेरिकन संघ पुरुषांच्या 4ƒ200 फ्री स्टाईलमध्ये देखील अपयशी ठरला. त्यांना चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले. टोकियोपूर्वी अमेरिकेचा संघ उतरलेल्या ऑलिम्पिक रिलेमध्ये कधीच अपयशी ठरला नव्हता. फ्री स्टाईलमध्ये अमेरिकेची लिडिया जेकबीने डाईव्ह मारल्यानंतर तिचा गॉगल खाली पडला आणि या पडझडीत तिची पिछाडी पूर्ण संघाला त्रासदायक ठरली. गॉगल पडल्यामुळे जेकबी वॉल पाहू शकत नव्हती. पुढे 18 वर्षीय टोरी हस्कने बटरफ्लाय लेगनंतर ड्रेसेलकडे बॅटन सोपवला, त्यावेळी अमेरिकेचा संघ 8.01 सेकंदांनी पिछाडीवर होता. ड्रेसेलने यानंतरही आटोकाट प्रयत्न करत ही पिछाडी भरुन काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्याने 46.99 सेकंदाची दिलेली वेळ त्याच्या बटरफ्लाय इव्हेंटमधील कामगिरीपेक्षा सर्वोत्तम होती. पण, तरीही झालेले नुकसान भरुन काढणे अशक्य होते.

ब्रिटनच्या कॅथलीन डॉसन, ऍडम पिटी, जेम्स व ऍना हॉपकिन यांनी 3 मिनिटे 38.86 सेकंदांचा नवा विश्वविक्रम रचत सुवर्ण जिंकले. चीन 3ः38.86 सेकंद वेळेसह रौप्य तर ऑस्ट्रेलिया 3ः38.95 सेकंद वेळेसह कांस्यपदकाची मानकरी ठरले. ड्रेसेलने शेवटचा टप्पा पूर्ण केला, त्यावेळी 3 मिनिटे 40.58 सेकंद इतका वेळ अमेरिकेने घेतल्याचे स्पष्ट झाले. या इव्हेंटमध्ये इटलीचा संघ चौथ्या स्थानी राहिला.

यंदा टोकियो ऑलिम्पिकमध्ये ड्रेसेलचे आणखी 2 इव्हेंट बाकी आहेत. पण, या दोन्ही इव्हेंटमध्ये सुवर्ण जिंकले तरी तो जास्तीत जास्त 5 सुवर्णपदकांपर्यंत पोहोचू शकेल, हे निश्चित होते.

एकाच ऑलिम्पिकमध्ये 6 व त्याहून अधिक सुवर्ण विजेते

ऍथलिट / देश / क्रीडा प्रकार / ऑलिम्पिक / सुवर्णपदके

मायकल फेल्प्स / अमेरिका / जलतरण / 2008 / 8

मार्क स्पित्झ / अमेरिका / जलतरण / 1972 / 7

मायकल फेल्प्स / अमेरिका / जलतरण / 2004 / 6

क्रिस्टिन इट्टो / पूर्व जर्मनी / जलतरण / 1988 / 6

व्हिटाली स्केर्बो / युनिफाईड / जिम्नॅस्टिक्स / 1992 / 6

बॉक्स

ऑलिम्पिक इतिहासात सर्वाधिक पदके

ऍथलिट / देश / क्रीडा प्रकार / सुवर्ण / रौप्य / कांस्य / एकूण

मायकल फेल्प्स / अमेरिका / जलतरण / 23 / 3 / 2 / 28

लॅरिसा लॅतिनिना / सोव्हिएत युनियन / जिम्नॅस्टिक्स / 9 / 5 / 4 / 18

मॅरित बोर्गेन / नॉर्वे / क्रॉस-कंट्री स्किईंग / 8 / 4 / 3 / 15

निकोलय अँद्रिनोव्ह / सोव्हिएत युनियन / जिम्नॅस्टिक्स / 7 / 5 / 3 / 15

Related Stories

निशीकोरी, डिमिट्रोव्ह, सिलीक दुसऱया फेरीत

Patil_p

अचंता शरथ कमलचे खेलरत्नसाठी नामांकन

Patil_p

वेल्सचा तुर्कीवर एकतर्फी विजय

Amit Kulkarni

इमर्जिंग क्रिकेटपटू पुरस्कारासाठी अर्शदीप सिंगची शिफारस

Patil_p

आरसीबी जिंकली…चर्चा तर होणारच!

Amit Kulkarni

हॉकी इंडियाच्या पॅनेलमध्ये नवे पंच, तांत्रिक अधिकाऱयांचा समावेश

Patil_p