सेल्फी काढण्यासाठी लोकांनी केली गर्दी
पंजाबच्या मानसा येथील एका भंगाराच्या व्यापाऱयाने भारतीय वायुदलाकडून 6 खराब झालेली हेलिकॉप्टर्स खरेदी केली आहेत. ही हेलिकॉप्टर्स पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली आहे. प्रत्येक हेलिकॉप्टरचे वजन 10 टन इतके असून लिलावाच्या माध्यमातून त्यांची खरेदी करण्यात आली आहे.
या हेलिकॉप्टर्सपैकी एक मुंबईतील एका व्यक्तीने खरेदी केले आहे. तर दोन हेलिकॉप्टर्स लुधियानातील हॉटेलमालकाने खरेदी केले आहेत. उर्वरित हेलिकॉप्टर मानसा येथे उभी करण्यात आली असून ती लोकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली आहेत.
पंजाबमध्ये भंगाराचा सामान खरेदी-विक्रीप्रकरणी मिठ्ठू कबाडिया यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. भारतीय वायुदलाकडून भंगाराच्या स्वरुपात हेलिकॉप्टर खरेदी करून मानसा येथील व्यापारी पोहोचला असता लोकांनी मोठी गर्दी केली. शहरातील लोक हेलिकॉप्टरच्या आत आणि बाहेर उभे राहून छायाचित्रे काढून घेऊ लागले. हे दृश्य पाहिल्यावर भंगार व्यापाऱयाच्या चेहऱयावरील आनंद स्पष्टपणे दिसून येत होता.
शहरात एकीकडे हेलिकॉप्टर मनोरंजनाचे साधन ठरत आहे, तर दुसरीकडे भंगार व्यापाऱयासाठी हा नफ्याचा व्यवहार ठरत आहे, कारण हॉटेल्स आणि पर्यटनस्थळांवर ही हेलिकॉप्टर्स उभी करण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत.