वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुजरातमध्ये नर्मदा जिल्हय़ाच्या केवडिया गावानजीक 3.1 तीव्रतेचा भूकंप झाला आहे. या भूकंपाच्या धक्क्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवित-आर्थिक हानी झालेली नसल्याची माहिती अधिकाऱयांनी मंगळवारी दिली आहे. 182 मीटर उंच ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ केवडिया गावानजीकच आहे. भूकंपाचे धक्के सोमवारी रात्री जाणवले आहेत. भूकंपामुळे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला कुठलेच नुकसान झालेले नाही. हा पुतळा शक्तिशाली भूकंप तसेच चक्रीवादळ झेलू शकेल अशाप्रकारे तयार करण्यात आल्याचे स्मारकाचे जनसंपर्क अधिकारी राहुल पटेल यांनी सांगितले आहे.
गांधीनगर येथील भूकंप संशोधन संस्थेने भूकंपाचे केंद्र केवडियापासून 12 किलोमीटर अंतरावर होते अशी माहिती दिली आहे. सोमवारी रात्री 10 वाजून 7 मिनिटांनी 3.1 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. याचे केंद्र दक्षिण गुजरातमध्ये जमिनीत 12.7 किलोमीटर खोलवर होते असे संस्थेकडून सांगण्यात आले.