आरटीआयद्वारे खुलासा ः मध्यप्रदेशात 10 हजारांहुन अधिक प्रमाण
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशात 2021 पर्यंत 128 कोटी 99 लाख आधारकार्ड तयार करण्यात आले आहेत. मागील 5 वर्षांमध्ये 3,55,884 आधारकार्ड बनावट असल्याचे आढळून आले आहे. या बनावट आधारकार्ड्सना युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने रद्दबातल केले आहे. यातील 10-12 हजार आधारकार्ड्स ही मध्यप्रदेशातील होती.
आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी युआयडीएआयकडून मल्टीपल तसेच डुप्लिकेट आधारकार्ड्स संबंधी माहिती मागितली होती. देशात मागील 5 वर्षांमध्ये 3,55,884 आधारकार्ड डुप्लिकेट आणि मल्टिपल आढळली असून ती रद्द करण्यात आल्याची माहिती गौड यांना देण्यात आली आहे.
बनावट आधारकार्डमध्ये नाव, घरचा पत्ता, जन्मतारीख आणि व्हर्च्युअली आयडी योग्य नसल्याचे आढळून आले. बनावट आधारकार्डचा क्रमांक युआयडीएआयच्या वेबसाइटवर पडताळून पाहिला गेला असता युआयडी आणि युआयडीएआयच्या डाटाबेसशी तो मॅच झाला नसल्याचे सांगण्यात आले.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयानुसार 2022 मध्ये जुलैपर्यंत देशात 1.47 कोटी लोकांनी स्वतःचे आधारकार्ड अपडेट करविले आहे. यासाठी लोकांनी आधारकेंद्रे तसेच ऑनलाइन आधार अपडेट पोर्टलची मदत घेतली, म्हणजेच जुलैच्या अखेरपर्यंत 63.55 कोटी लोकांनी स्वतःच्या आधारकार्डचा डेमोग्राफिक तसेच बायोमेट्रिक तपशील अपडेट करविला आहे.
एलपीजी, मनरेगा आणि नॅशनल सोशल असिस्टेंस प्रोग्राम समवेत अनेक योजनांचा लाभ लोकांपर्यंत थेट हस्तांतरण योजनेच्या माध्यमातून पोहोचविण्यात आधारची महत्त्वाची भूमिका आहे. देशभरात जुलै 2022 मध्ये 12511 कोटी रुपयांचे व्यवहार आधार पेमेंट ब्रिजच्या माध्यमातून करण्यात आले.