ऑनलाईन टीम / तरुण भारत :
जुन्या गाडय़ा खरेदी-विक्रीच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून पुण्यातील व्यावसायिकाची तीन कोटींची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
कपिल जगमोहन धिंग्रा (वय 40, रा. वाकड, पुणे) व गौरी कपिल धिंग्रा (रा. मुकुंदनगर, पुणे) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. राजेश रामचंद्र मेहता (वय 55, रा. मुकुंदनगर, पुणे) यांनी याप्रकरणी स्वारगेट पोलिसात तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कपिल धिंग्रा व गौरी धिंग्रा हे वाहन व्यावसायिक आहेत. त्यांनी व्यावसायिक राजेश मेहता यांच्याशी ओळख वाढवली. त्यानंतर या जोडीने संगनमताने मेहता यांना जुन्या गाडया खरेदी विक्री व्यवसायात 50 टक्के भागीदारी देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी त्यांना 2 कोटींची गुंतवणूक करण्यास सांगितले. मेहता यांनीही धिंग्रा यांच्यावर विश्वास ठेवून गुंतवणूक केली. मात्र, नंतर धिंग्रा यांनी पैसे परत देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर मेहता यांनी पोलिसात तक्रार करणार असल्याचे सांगितल्यावर धिंग्रा यांनी वाकड परिसरातील आपला 80 लाखांचा फ्लॅट त्यांना देत असल्याचे भासवले. त्यासाठी ॲग्रीमेंट ऑफ असायमेंटही केले. पण त्यानंतर परस्पर हा फ्लॅट कैलास कदम या व्यक्तीस विकून फसवणूक केली. त्यानंतर मेहता यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात कपिल धिंग्रा व गौरी धिंग्रा यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दिली. पुढील तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.
हेही वाचा : FTII मध्ये विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या