तिन्ही स्पावर कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप
प्रतिनिधी /म्हापसा
कळंगूट पोलिसांनी मसाज पार्लरवर कारवाई करीत जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार कळंगूट व कांदोळी येथील एकूण 3 मसाज पार्लर सिलबंद केले असल्याची माहिती कळंगूट पोलीस स्थानकाचे निरीक्षक लक्षी आमोणकर यांनी दिली. गेल्या महिन्यात कळंगूट पोलिसांनी आपल्या हद्दीत येणाऱया एकूण 42 मसाज पार्लरची पडताळणी करून मामलेतदार समवेत तपासणी केली होती यातील 3 मसाज पार्लर संशयास्पद आढळल्याने त्यांच्याकडे पाहिजे ते आवश्यक कागदपत्रेही नव्हती याची दखल घेत जिल्हाधिकाऱयांनी हे संशयास्पद तिन्हीही मसाज पार्लर स्पा सिलबंद करावेत असा आदेश दिला होता त्या आदेशाला अनुसरून बार्देशचे मामलेतदार कृष्णा गावस यांच्या उपस्थितीत निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या नेतृत्वाखाली हे तीन मसाज पार्लर सिलबंद करण्यात आले. ही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती निरीक्षक लक्षी आमोणकर यांनी दिली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राज्यात म्हापसा येथे एका मसाज पार्लरवर चंदगड येथील पर्यटक गोव्यात आले असता काही एजंटनी त्या पर्यटकांना मारहाण केली व त्यांच्याकडील दागिने तसेच रोख रुपये लुबाडण्यात आले होते. हे प्रकरण दोन दिवसानंतर वाऱयासारखे सर्वत्र पसरल्यावर राज्यभर या विरुद्ध कडव्या प्रतिक्रिया ऐकू येऊ लागल्या. सर्वांनी पोलीस खात्यावर आपले ताशेरे ओढले. याची दखल घेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील सर्व मसाज पार्लर पडताळून पाहण्याचा आदेश दिला व गैरकृत्य तसेच बेकायदेशीर मसाज पार्लर बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. पोलिसांना या प्रकरणी फ्रि हॅण्ड दिल्यावर सर्वप्रथम पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी हणजूण पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या बेकायदेशीर दोन पार्लरवर छापा घालून त्यावर कारवाई करीत तेथील व्यवस्थापनाला नोटीस बजावून एकास ताब्यात घेतले व नंतर दोन मसाज स्पा निरीक्षक विक्रम नाईक यांच्या नेतृत्वाखाली सिलबंद केले.
कळंगूट भागात मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीर मसाज पार्लर चालतात असा आरोप काही मंत्री आमदारांनी केल्यावर त्याची दखल घेत निरीक्षक लक्षी आमोणकर यांनी त्यांच्या हद्दीत असलेल्या एकूण 42 मसाज पार्लरची तपासणी केली होती व तो अहवाल जिल्हाधिकाऱयांना पाठविण्यात आला होता. त्या अहवालाची पडताळणी करून जिल्हाधिकाऱयांनी कांदोळी येथील आयू स्पा, लिली सलून ऍण्ड स्पा व झा सलून ऍण्ड स्पा हे तीन स्पा सिलबंद केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक लक्षी आमोणकर यांनी दिली. यावेळी बार्देशचे मामलेतदार कृष्णा गावस उपस्थित होते. त्यांच्या व आरोग्य अधिकाऱयांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.
गैरकृत्यांना कळंगुटमध्ये थारा नाही- निरीक्षक लक्षी आमोणकर
पुढील आठवडय़ापासून पावसाळी अधिवेशन सुरू होते त्याची दखल घेत कळंगूट पोलिसांनी ही कारवाई केल्याचे समजते. कळंगूट पोलीस हद्दीत बेकायदेशीर गैरकृत्याना थारा दिला जाणार नाही अशी माहिती निरीक्षक लक्षी आमोणकर यांनी दिली. कळंगूट भागात आणि पोलीस हद्दीत अंदाजे 42 मसाज पार्लर आहेत त्या सर्वांच्या कागदपत्राची पडताळणी करण्यात आली आहे. या भागात कोणतीही गैरकृत्ये खपवून घेणार नाही. काही संशयास्पद आढळल्यास पार्लर सिलबंद करण्यात येईल असा दमही त्यांना दिलेला आहे. काही एजंट, टाऊड आदी या भागात मोठय़ा प्रमाणात दिसत होते मात्र सर्वांनीच त्यांच्या विरोधात आठविल्याने त्या सर्वांना हाकलून लावण्यात आल्याची माहिती निरीक्षकांनी दिली. सर्वत्र बिनगणवेश एलआयबी टीम तसेच गस्तीवरील पोलीस पाळत ठेवून आहेत. अशी माहिती देण्यात आली.