नववर्षाच्या पहिल्याच दिवशी काश्मीरमध्ये तीन ठिकाणी हल्ले
@ श्रीनगर / वृत्तसंस्था
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रविवारी जम्मू-काश्मीरमध्ये तीन दहशतवादी हल्ले झाले. पुलवामाच्या राजपोरा भागात रविवारी सकाळी सीआरपीएफ जवानाकडून एके-47 रायफल हिसकावल्याची घटना उघडकीस आली. तर संध्याकाळी उशिरा राजौरीमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला. अन्य एका घटनेत श्रीनगरमधील हवाल चौकात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या 28 बटालियनच्या बंकरवर ग्रेनेडने हल्ला केला. या हल्ल्यांनंतर सुरक्षा दलांना सतर्क करण्यात आले आहे.
जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिह्यातील डांगरी गावात रविवारी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. गोळीबाराच्या या घटनेनंतर सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोरांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. हल्लेखोरांना पकडण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली होती.
सीआरपीएफच्या बंकरवर ग्रेनेड हल्ला
दुसरीकडे, रविवारी श्रीनगरच्या हवाल चौकात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या 28 बटालियनच्या बंकरवर ग्रेनेडने हल्ला केला. हल्लेखोरांचे लक्ष्य चुकल्यामुळे रस्त्यावर ग्रेनेडचा स्फोट झाला. या हल्ल्यात समीर अहमद मल्ला हा नागरिक जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी परिसराची नाकाबंदी केली आहे.
पुलवामामध्ये जवानाकडील रायफल हिसकावली
रविवारी सकाळी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिह्यातील राजपोरा भागात सीआरपीएफ जवानाकडून एके-47 रायफल हिसकावल्याची घटना समोर आली. यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि दहशतवाद्यांचा शोध सुरू केला. सायंकाळी रायफल हिसकावणाऱया तरुणाला त्याच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात नेऊन रायफल परत केल्यामुळे या घटनेवर पडदा टाकण्यात आला. सुरक्षा दलाने सदर कुटुंबाचे कौतुक केले आहे. रायफल हिसकावणाऱया तरुणाचे नाव 25 वषीय इरफान बशीर गनी असे आहे.