Tarun Bharat

लखनौत इमारत कोसळून 3 ठार

नेपाळमधील भूकंपाचा परिणाम असल्याची शक्यता

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील एक चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत किमान 3 लोकांचा बळी गेला आहे. मंगळवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली. राष्ट्रीय आपत्तीनिवारण दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्तीनिवारण दल (एसडीआरएफ) या संस्थानी घटनास्थळी साहाय्यता कार्याला त्वरित प्रारंभ केला असून इमारतीचा ढिगारा हालविण्याचे कार्य केले जात आहे.

या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर परिसरातील रुग्णालयांमध्ये उपचार पेले जात आहेत. जखमींना आवश्यक ते सर्व साहाय्य देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले असून लखनौचे महापालिका प्रशासन तसेच राज्य सरकारचे संबंधित विभाग साहाय्यता कार्यावर लक्ष ठेवीत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. कोसळलेल्या इमारतीचे नाव अलिया ऍपार्टमेंट असे असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक घटनास्थळी असून साहाय्यता कार्याची पाहणी करीत आहेत. इतर वरीष्ठ प्रशासकीय अधिकारीही त्यांच्यासह आहेत.

नेपाळच्या भूकंपाचा परिणाम

नेपाळमध्ये मंगळवारी दुपारीच 5.8 रिष्टर क्षमतेचे भूकंप भारताच्या सीमेनजीक झाला आहे. या भूकंपाचे हादरे जवळपास संपूर्ण उत्तर भारताला बसले. उत्तर प्रदेशमध्येही या भूकंपाचे पडसाद मोठय़ा प्रमाणात जाणवले. ही जीर्ण झालेली इमारत या भूकंपाच्या हादऱयानेच कोसळली असावी अशी शक्यता व्यक्त होत आहे.

मृतांची संख्या वाढणार ?

इमारतीच्या ढिगाऱयाखाली आणखी 25 हून अधिक लोक अडकले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढू शकते अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचविणे हे आपत्तीनिवारण संस्थांचे ध्येय असून त्या दिशेने साहाय्यता कार्य सुरु करण्यात आले आहे. सावधगिरीने ढिगारे हलविण्यात येत असून त्याच्या खाली अडकलेले लोक सुरक्षित रहावेत अशा प्रकारे कार्य करण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशामक दलही उपस्थित आहे.

नेमके कारण काय

इमारत कोसळण्याची दोन कारणे दिली जात आहेत. त्यांपैकी एक नेपाळचा भूकंप असल्याचे सांगितले जात असले तरी या परिसरातील अन्य इमारतींची हानी या भूकंपामुळे झालेली नाही. ही इमारत जुनी असल्याचे कारणही सांगितले जात आहे. तसेच इमारतीचे बांधकाम योग्य नसल्याचाही आरोप होत आहे. या दुर्घटनेची चौकशी होणार असून चौकशीनंतरच कारण कळू शकणार आहे.

सात कुटुंबांचे वास्तव्य

कोसळलेल्या अलिया ऍपार्टमेंट या इमारतीत सात कुटुंबांचे वास्तव्य होते अशी माहिती देण्यात आली. एकंदर जवळपास 50 जण रहात असावेत. त्यांच्यापैकी काही जण दुर्घटना घडली तेव्हा घराबाहेर गेले होते. मात्र, त्यांची नेमकी संख्या कळलेली नाही. तसेच ढिगाऱयाखाली किती लोक आहेत याचेही नेमके अनुमान अद्याप काढता आलेले नाही. ही माहिती बुधवारी मिळण्याची शक्यता आहे.

Related Stories

अविवाहितांचे गाव

Patil_p

महागाईविरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन सुरू

Amit Kulkarni

बिहारमध्ये दिवसभरात 309 नवे कोरोना रुग्ण

Tousif Mujawar

जास्त सिमकार्ड असतील तर सेवा होणार बंद; दूरसंचार विभागाचे आदेश जरी

Archana Banage

देशात कोळशाचा पुरेसा साठा ः प्रल्हाद जोशी

Patil_p

काँग्रेस आमदाराकरता योगी आदित्यनाथ पूजनीय

Patil_p