मंत्री नीळकंठ हळर्णकर यांची घटनास्थळी भेट, आर्थिक मदत देण्याचे आश्वासन
प्रतिनिधी /म्हापसा
सोनारवाडा कामुर्ली येथे असलेल्या गोलतेकर बार जवळ राहणाऱया संगीता वेर्णेकर यांच्या घराला आग लागून संपूर्ण आगीत जळून खाक झाले. आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नसले तरी ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत वेर्णेकर कुटुंबियांचे अंदाजे 3 लाख रुपयांचे नुकसान झाले असून आगीची माहिती मिळताच मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व वेर्णेकर कुटुंबियांना धीर दिला.
याबाबत म्हापसा अग्निशमन दलाचे अधिकारी बॉस्को फेर्राव यांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी सव्वाचार वाजण्याच्या दर्यान कामुर्ली सोनारवाडा येथे वेर्णेकर कुटुंबियांच्या घराला आग लागल्याची माहिती मिळाल्यावर उपअधीकारी अशोक परब यांच्या नेतृत्वाखाली जवान प्रेमानंद कांबळी, परेश मांद्रेकर, विष्णू नाईक आदींनी घटनास्थळी धाव घेऊन सुमारे 5 लाखाची मालमत्ता वाचविण्यास यश मिळविले.
या आगीत घरातील छप्पर, लाकडी बीम, कपडे, नारळ, घरातील सामान, टीव्ही संच आदी घरातील सामान जळून खाक झाले. या आगीत वेर्णेकर कुटुंबियांचे सुमारे 3 लाख रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळाल्यावर मंत्री नीळकंठ हळर्णकर घटनास्थळी गेले व पाहणी केली. आपत्कालीन आर्थिक मदत देण्यास आपण सरकारी दरबारी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.