6 ते 8 दहशतवाद्यांचे कृत्य ः फरार हल्लेखोरांचा शोध सुरू
पेशावर / वृत्तसंस्था
पाकिस्तानातील पेशावरमधील सरबंद पोलीस ठाण्यावर शनिवारी दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये तीन पोलिसांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात 6 ते 8 दहशतवादी सहभागी होते. ते ग्रेनेड आणि स्नायपर गन घेऊन पोलीस ठाण्यात घुसले. त्यावेळी 12 ते 14 पोलीस अधिकारी ठाण्यात हजर होते. गोळीबार केल्यानंतर सर्व दहशतवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. दहशतवाद्यांनी स्टेशनला दोन ते तीन बाजूंनी घेरून हल्ला केला. सुमारे दोन तास त्यांची आणि पोलिसांची चकमक चालली.
शेजारी देश पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असतानाच दुसरीकडे पाकिस्तानमधील दहशतवादी घटनाही थांबण्याचे नाव घेत नाहीत. तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने नुकत्याच केलेल्या हल्ल्यात तीन पोलीस ठार झाले आहेत. टीटीपीने पाकिस्तानातील पेशावरमधील एका पोलीस स्टेशनवर हल्ला करत खळबळ माजवली आहे. सहा ते आठ सशस्त्र दहशतवाद्यांनी हँडग्रेनेड, स्वयंचलित शस्त्रे आणि स्नायपर शस्त्रांच्या मदतीने पेशावरच्या सरबंद पोलीस स्थानकावर मोठा हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान क्रॉस फायरिंगमध्ये तिघांना प्राण गमवावे लागले. या हल्ल्यात पोलीस उपअधीक्षक सरदार हुसैन यांच्यासह दोन हवालदारांचा मृत्यू झाल्याचे पेशावरचे एसएसपी कासिफ अब्बासी यांनी सांगितले. खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री महमूद खान यांनी या हल्ल्याचा निषेध केला आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईत पोलिसांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. दहशतवाद्यांच्या शोधासाठी परिसरात शोधमोहीम राबविण्यात येत आहे.
‘टीटीपी’ने स्वीकारली जबाबदारी
तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. टीटीपी हा विविध कट्टरपंथी संघटनांचा एक गट असून तो अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवरून कार्यरत आहे. टीटीपीची स्थापना 2007 मध्ये झाली असून अलीकडच्या काळात ही दहशतवादी संघटना पाकिस्तानमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले करत आहे. टीटीपीने गेल्या वषी नोव्हेंबरच्या अखेरीस पाकिस्तानी लष्करासोबतचा युद्धविराम संपवला. त्यानंतर ही दहशतवादी संघटना पाकिस्तानचे लष्कर आणि सुरक्षा आस्थापनांवर सातत्याने हल्ले करत आहे.