ओडिशातील धक्कादायक घटना : मृत्यूच्या कारणाबद्दल संशय
वृत्तसंस्था /पारादीप
ओडिशात दोन रशियन नागरिकांच्या मृत्यूचा तपास अद्याप पूर्ण झालेला नसतानाच आणखी एका रशियन नागरिकाचा मृतदेह सापडला आहे. ओडिशात झालेल्या रशियन नागरिकांच्या मृत्यूमागे एखादा कट आहे का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मिलाकोव्ह सर्गेई असे या मृत रशियन नागरिकाचे नाव आहे. त्याचा मृतदेह जगतसिंहपूर जिल्हय़ातील पारादीप बंदरावर मालवाहू जहाजात आढळून आला आहे.
51 वर्षीय मिलाकोव्ह सर्गेई यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला असावा असा प्राथमिक अंदाज ओडिशा पोलिसांनी व्यक्त केला आहे. सर्गेई यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होणार आहे. मागील 15 दिवसांमध्ये तीन रशियन नागरिक ओडिशात संशयास्पद स्थिती मृतावस्थेत आढळून आले आहेत.
काही दिवसांपूर्वी रशियन खासदारांसह आणखी एका नागरिकाचा रायगडा जिल्हय़ातील हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. हे दोघेही रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांचे टीकाकार म्हणून ओळखले जात होते. याचदमयान रशियाचा एक नागरिक बेपत्ता असल्याचे वृत्त समोर आले होते.
रशियन नागरिकांच्या मृत्यूंच्या चौकशीवरून ओडिशाचे पोलीस महासंचालक सुनील बंसल यांनी माहिती दिली होती. रशियन नागरिकांच्या मृत्यूच्या चौकशीत पोलीस कुठलाच हलगर्जीपणा दाखवत नसून गरज भासल्यास आम्ही इंटरपोलची देखील मदत घेणार आहोत असे बंसल यांनी म्हटले आहे. तर काही दिवसांपूर्वी रशियाचा एक नागरिक ओडिशाच्या रेल्वेस्थानकावर निदर्शने करताना दिसून आला होता. त्याने फलक हातात घेतला होता आणि त्यावर ‘आपण पुतीन यांचे विरोधक आहोत’ असे नमूद केले होते. पुतीन यांनी युक्रेनविरोधातील युद्ध थांबवावे असे त्याचे म्हणणे होते. आपण शरणार्थी असून मदतीची गरज असल्याचे त्याने म्हटले होते.
काही दिवसांपूर्वी नाताळानिमित्त चार रशियन नागरिक ओडिशात पोहोचले होते. चारही जण कंधमाल जिल्हय़ातील दारिंगबाडी हिल स्टेशनला भेट देऊन आले होते. त्यांच्यासोबत एक गाईड देखील होता. रात्रीच्यावेळी ते साई इंटरनॅशनल हॉटेलमधील खोलीत झोपण्यासाठी गेले होते. याच हॉटेलच्या खोलीत दोन रशियन नागरिकांचे मृतदेह आढळून आले होते. मृतांमध्ये रशियाचे खासदार पॉवेल एंटोव्ह यांचा समावेश होता. तर त्यांचे मित्र व्लादिमीर ब्यदानोव्ह यांचा मृत्यूही रहस्यमय स्थितीत झाला आहे.