काश्मिरी पंडित पूरन भट्ट यांच्या हत्येचा सूड उगवला ः
@वृत्तसंस्था / श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या शोपियांमधील मुंज मार्ग भागात मंगळवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांदरम्यान चकमक झाली आहे. या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे तीन दहशतवादी मारले गेले आहेत. या मृत दहशतवाद्यांकडून एके-47 रायफल आणि 2 पिस्तुल हस्तगत करण्यात आल्या आहेत. मारले गेलेले तिन्ही दहशतवादी स्थानिक होते आणि यातील दोघांची ओळख पटल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी दिली आहे.
शोपियांचा रहिवासी असलेला दहशतवादी लतीफ लोन हा काश्मिरी पंडित पूरन कृष्ण भट्ट यांच्या हत्येत सामील होता. तर अनंतनागचा रहिवासी उमर नजीर हा नेपाळच्या तिलबहादुर थापाच्या हत्येत सामील होता. शोपियांतील एका चकमकीत माझ्या पतीच्या हत्येत सामील दहशतवाद्याला दहशतवाद्यांनी ठार केले, आम्हाला न्याय मिळाला. या दहशतवाद्याने एका निर्दोष व्यक्तीचा जीव घेतला होता, याचा सूड उगवून सुरक्षा दलांनी चांगले काम केल्याचे उद्गार पूरन कृष्ण भट्ट यांच्या पत्नीने काढले आहेत.
शोपियांच्या चौदरीगुंड गावात काश्मिरी पंडित पूरन कृष्ण भट्ट यांना दहशतवाद्यांनी गोळय़ा घालून ठार केले होते. या घटनेच्या विरोधात काश्मिरी पंडितांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता, काश्मिरी पंडितांनी रस्त्यांवर उतरून निदर्शने केली होती.
एसआयटी स्थापन
राजौरी जिल्हय़ात सैन्याच्या एका शिबिराबाहेर झालेल्या गोळीबारात दोन नागरिक मारले गेले होते. याप्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांनी विशेष तपास पथक नेमले आहे. गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू आणि एक जण जखमी झाल्याने शुक्रवारी राजौरीमध्ये मोठय़ा प्रमाणावर निदर्शने झाली होती. लोकांनी या गोळीबाराच्या घटनेच्या चौकशीची मागणी केली होती.
एका वर्षात 24 हिंदूंची हत्या
मागील एक वर्षादरम्यान काश्मीर खोऱयात दहशतवाद्यांकडून 24 काश्मिरी आणि बिगर-काश्मिरी हिंदूंची हत्या करण्यात आल्याचे काश्मिरी पंडितांच्या विविध संघटनांनी सांगितले आहे. पोलिसांकडून हिंदू कर्मचाऱयांची यादी लीक होण्याच्या घटनेच्या चौकशीची मागणी भाजप प्रवक्ते अल्ताफ ठाकूर यांनी केली आहे. काश्मिरी हिंदू कर्मचारी कुठे तैनात आहे याची माहिती दहशतवाद्यांकडे आहे. सरकारने याची दखल घेत पावले उचलावीत असे त्यांनी म्हटले आहे.
चालू वर्षात 176 दहशतवादी ठार
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पोलीस आणि सैन्याकडून सातत्याने मोहीम राबविण्यात येत आहे. यादरम्यान चकमकींमध्ये अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. चालू वर्षात ऑक्टोबरपर्यंत 176 दहशतवादी मारले गेले आहेत. यात 126 स्थानिक दहशतवादी होते. जम्मू-काश्मीरमध्ये सध्या एकूण 134 दहशतवादी सक्रीय आहेत. यातील 83 विदेशी आणि 51 स्थानिक दहशतवादी आहेत.