गुप्त मोहीम अन् टेहळणीत तरबेज ड्रोन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय नौदलाने अमेरिकेकडून शस्त्रास्त्रांनी युक्त 30 प्रिडेटर ड्रोनच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविला आहे. भारताने चीनच्या विंग लाँग 2 ड्रोनच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलले आहे. तिन्ही संरक्षण दलांसाठी नौदल या मोहिमेचे नेतृत्व करत आहे. सैन्याने संरक्षण मंत्रालयाला यासंबंधी लवकर बैठक आयोजित करण्यास सांगितले आहे. नौदल दीर्घकाळापासून समुद्रात टेहळणी करण्यासाठी नवे ड्रोन्स तैनात करण्याचा विचार करत होते.
नौदल, सैन्य आणि वायुदलाला प्रत्येकी 10 ड्रोन मिळणार आहेत. अमेरिकेकडून भाडेतत्वावर प्राप्त ड्रोन्सच्या वापराबद्दल संरक्षण दले अत्यंत समाधानी दिसून येत आहेत. हे प्रिडेटर ड्रोन गायडेड बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांनी युक्त असणार आहेत. भारत भविष्यात अशाप्रकारचे आणखीन 18 ड्रोन खरेदी करण्याचा विचार करत आहे. हे ड्रोन्स शासकीय कराराच्या अंतर्गत युएस फॉरेन मिलिट्री सेल्सद्वारे खरेदी केले जाणार आहेत.
प्रीडेटर-बीचे युद्धात परीक्षण करण्यात आले आहे. सीरिया, इराक, अफगाणिस्तान, इराण, लीबिया, माली, येमेन आणि पाकिस्तानात या ड्रोनने कामगिरी फत्ते केली आहे. हा ड्रोन हेलफायर अँटी आर्मर मिसाइल आणि दोन लेझर गायडेड बॉम्बसह उड्डाण करू शकतो. जनरल अटेमिक्स एअरोनॉटिकल सिस्टीम्सकडून तयार करण्यात आलेले हे एमक्यू-9 रीपर ड्रोन गुप्त मोहीम, टेहळणी, एअर सपोर्ट, कॉम्बॅट सर्च, बचावकार्य, टारगेट डेव्हलपमेंट आणि सामग्री वाहतुकीसह अनेक कामे सहजपणे करू शकतो. या ड्रोन्सची उड्डाणक्षमता 48 तासांपर्यंत आहे. तसेच तो 6 हजार नॉटिकल मैलापर्यंत जाऊ शकतो. याचबरोबर 6 टन पेलोड वाहून नेऊ शकतो.