पंतप्रधान मोदी होणार सहभागी- अफगाण संकटावर चर्चा शक्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 ऑक्टोबरपासून 9 नोव्हेंबरपर्यंत विदेश दौऱयावर असणार आहेत. 5 दिवसांच्या या दौऱयात पंतप्रधान मोदी हे इटलीतील रोम तसेच ग्लासगो येथे जाणार आहेत. तसेच 16 वी जी-20 शिखर परिषद तसेच जागतिक नेत्यांची परिषद सीओपी-26 मध्ये ते भाग घेणार आहेत.
जी-20 समुहाच्या सदस्य देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि शासन प्रमुखांची ही शिखर परिषद रोम शहरात 30-31 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. यात सदस्य देशांचे नेते आणि काही आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार ओत. या संमेलनात कोरोना महामारीच्या आव्हानानंतरची सुधारणा, हवामान बदल आणि जगातील विविध हिस्स्यांमधील गरीबी तसेच विषमता यासारख्या प्रमुख आव्हानांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. तसेच अफगाणिस्तानमधील स्थितीवरून चर्चा होऊ शकते.
या परिषदेत पंतप्रधान मोदी हे जागतिक आव्हानांवरील भारताची भूमिका मांडू शकतात. तसेच अफगाणिस्तानच्या स्थितीवर जागतिक दृष्टीकोन अवलंबिण्याचे आवाहन करू शकतात. याचबरोबर हवामान बदल आणि कोरोना महामारीच्या विरोधात एकजुटतेचा मुद्दा त्यांच्याकडून उपस्थित केला जाऊ शकतो.