प्रतिनिधी /मडगाव
मुरगाव नगरपालिकेच्या एका निवृत्त कर्मचाऱयाला त्याची निवृत्ती वेतनाची थकबाकी म्हणून 60 हजार रुपये 30 दिवसाच्या आत देण्याचा आदेश गोवा मानवी हक्क आयोगाने दिला आहे. ओरुले- वास्को येथे राहणाऱया कृष्णनाथ पांडुरंग हरमलकर यांनी या प्रकरणासंबंधी या आयोगाकडे तक्रार केली होती.
जानेवारी 2016 ते ऑगस्ट 2017 या काळातील निवृत्ती वेतन मिळालेले नसल्याची श्री. हरमलकर यांनी या आयोगाकडे 29 ऑक्टोबर 2018 रोजी तक्रार केली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने आयोगाने 8 नोव्हेंबर 2018 रोजी एक आदेश जारी केला. मुरगाव पालिकेच्या मुख्याधिकाऱयाने या तक्रारीसंबंधी अहवाल सादर करावा असे या आदेशात म्हटले होते.
7 डिसेंबर 2018 रोजी मुख्याधिकाऱयानी अहवाल सादर केला. निधी नसल्यामुळे ही थकबाकी देण्याचे राहून गेलेले आहे आणि एकदा का निधी उपलब्ध झाला की ही थकबाकी तीन महिन्यात देऊ असे उत्तर मुरगाव पालिकेच्या मुख्याधिकाऱयाने आयोगाला सादर केले होते.
आपल्याला थकबाकी मिळालेली नाही असे तक्रारदाराने 7 मार्च 2019 रोजी या आयोगाला पुन्हा कळविले. जानेवारी 2016 ते ऑगस्ट 2017 या कालावधीतील थकबाकी 60 हजार रुपये इतकी होत होती.
थकबाकी देण्यासाठी 3 महिन्यांची मुदत मुरगाव नगरपालिकेने मागितली होती. 3 महिन्यांची मुदत संपून दोन वर्षे झाली तरी थकबाकी देण्यात आलेले नसल्याचे आयोगाच्या निदर्शनाला आले तेव्हा 30 दिवसांच्या आत तक्रारदार श्री. हरमलकर यांना 60 हजार रुपयांची थकबाकी देण्यात यावी आणि 1 सप्टेंबर 2017 पासून थकबाकी देईपर्यंत त्यावर 6 टक्के दराने व्याज देण्यात यावे असा आदेश दिला.
गोवा मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्या. उत्कर्ष बाक्रे, सदस्य डेस्मंड डिकॉश्ता आणि प्रमोद कामत यांच्या या आदेशावर स्वाक्षऱया आहेत.