स्पेनमधील गाव
जग आम्हाला जसे दिसते प्रत्यक्षात ते तसेच असेल असे नाही. प्रत्येक काळात एक वेगळय़ा प्रकारचे जग असते. काही मानवी संस्कृती लुप्त झाल्या असून त्याच्या खुणा आजही सापडतात. त्यांचे गाव, त्यांची सामग्री, राहण्याची पद्धत, जमिनीत उत्खनन केल्यावर अनेक रहस्य समारे येतात. असेच एक गाव स्पेनमध्ये होते. पोर्तुगालच्या सीमेवरील हे गाव 30 वर्षांनी पुन्हा दृष्टीस पडले आहे.
या गावाला घोस्ट व्हिलेज म्हणजेच भूत गाव या नावानेही ओळखले जाते. तसेच याचे नाव एसेरेडो असून 1992 नंतर आता पहिल्यांदाच ते दृष्टीस पडले आहे. हे गाव पाण्यात पूर्णपणे बुडाले होते. धरणात पूर्णपणे बुडाल्यावर आता हे पुन्हा नजरेस पडले आहे.
पूर्ण भाग कोरडा
गॅलिसियाच्या भागात पाणी पोहोचविण्यासाठी हे धरण बांधण्यात आले होते. तेव्हा हे गाव लिमिया नदीच्या पाण्यात बुडाले होते. परंतु आता तेथे दुष्काळसदृश स्थिती निर्माण होतेय. धरणात आता केवळ 15 टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. या धोक्याबद्दल पर्यावरण मंत्रालयाने लोकांना इशारा दिला आहे.
पाण्यात बुडालेल्या भिंती आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. लोक ठिकठिकाणाहून हे गाव पाहण्यासाठी पोहोचत आहेत. छायाचित्रे काढून घेण्यासह चित्रिफिती तयार करत आहेत. गाव नजरेत पडल्यावर तेथे कधीकाळी असलेला कॅफे, कारंजा, गंजलेली वाहने दिसून आली आहेत.
एक महिला स्वतःच्या मित्रांसोबत 1992 मध्ये येथे आली होती. हे ठिकाण अत्यंत सुंदर आणि हिरवेगार होते. येथे द्राक्ष आणि संत्र्यांच्या बागा असायच्या असे तिने म्हटले आहे. तर पाऊस कमी पडल्याने येथील दुष्काळ वाढत चालल्याचे स्थानिक महापौराचे म्हणणे आहे.