डॉ. कशाळीकर दांपत्याचे योगदान
प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:
‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना कोणताही धोका पोहोचू नये, यासाठी सावंतवाडीतील वैद्यकीय व्यावसायिक डॉ. सुबोधन कशाळीकर आणि डॉ. माधवी कशाळीकर या दांपत्याने सावंतवाडी तालुक्यातील तब्बल 30 हजार नागरिकांना ‘आर्सेनिक अल्बम’ या शासनमान्य आयुर्वेद गोळय़ांचे मोफत वितरण केले. या कामी त्यांना कुडाळ येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल कुलकर्णी व प्रज्ञा कुलकर्णी यांचे मोलाचे सहकार्य मिळले.
चाकरमान्यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गात कोरोनाचा शिरकाव होणार, हे लक्षात येताच केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार गेली 30 वर्षे सावंतवाडीत वैद्यकीय व्यवसाय करणाऱया डॉ. सुबोधन व डॉ. माधवी कशाळीकर दांपत्याने जिल्हय़ातील नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मोफत आयुर्वेदिक गोळय़ांचे वितरण करण्याचा निर्णय घेतला. 9 ते 27 मे 2020 या 19 दिवसांच्या कालावधीत त्यांनी सावंतवाडी तालुक्यातील सहा हजार कुटुंबातील 30 हजार नागरिकांना या गोळय़ा पोहोच केल्या. याव्यतिरिक्त त्यांनी कुडाळ येथील लुपिन फाऊंडेशन या संस्थेला नाममात्र दरात 1500 कुटुंबियांसाठी गोळय़ा उपलब्ध करून दिल्या. तसेच आणि काही संस्थांनाही अल्प दरात या गोळय़ांचा पुरवठा केला. या गोळय़ा वितरित करण्यासाठी त्यांनी सावंतवाडी येथील आपल्या दवाखान्यात एक सेंटर सुरू केले. या सेंटरमधूनच जवळपास सहा हजार कुटुंबियांनी प्रत्यक्ष येऊन गोळय़ा नेल्या. यावेळी गोळय़ा न्यायला येणाऱया नागरिकांना कोरोना टाळण्यासाठी कोणत्या व कशा दक्षता घ्याव्यात, याबाबत माहिती या डॉक्टर दाम्पत्याने दिली.
या उपक्रमाबाबत बोलताना डॉ.सुबोधन व डॉ.माधवी म्हणाल्या की,
कोरोनाविरुद्धच्या लढय़ात आपलेही योगदान राहावे. कोरोनामुळे कोणालाही धोका पोहोचू नये, या उद्देशाने व्यावसायिक भावना बाजूला ठेवून माणुसकीच्या भावनेतून हा उपक्रम आम्ही तडीस नेला. या कामी आम्हाला कुडाळ येथील व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते अनिल व प्रज्ञा कुलकर्णी दाम्पत्याचे मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमाचा लाभ सावंतवाडीतील अनेक बँक व संस्थांचे कर्मचारी यांनीही लाभ घेतला.