75 वर्षीय शिक्षकाची थक्क करणारी कामगिरी
मुलांना शिकविल्या जाणाऱया गोष्टी स्वतः अगोदर आचरणात आणणे हीच शिक्षकाची खरी ओळख आहे. अंतर्यामी साहो अशाच पठडीतील शिक्षक आहेत. 11 वर्षे वय असताना त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा झाड लावले होते. शाळेकडून चालविण्यात आलेली मोहीम नव्हे तर वृक्ष-रोपांबद्दलच्या प्रेमातून त्यांनी हे कृत्य केले होते. स्वतःच्या शाळेत त्यांनी हे रोप झाले होते. अंतर्यामी आता 75 वर्षांचे असून आतापर्यंत त्यांनी 30 हजारांहून अधिक रोपांची लागवड केली आहे.
ओडिशाच्या कांटिलो गावाचे ते रहिवासी आहेत. सार्वजनिक स्थानी वृक्षारोपण करण्यावर त्यांचा भर असतो. वयासोबत त्यांची वृक्षांबद्दलची आत्मियता वाढतच गेली. सिलेटपाडा येथील शाळेत शिक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केल्यावर त्यांनी मुलांना देखील हाच संदेश दिला. जेथेजेथे बदली झाली, तेथील मुलांना त्यांना वृक्ष-रोपांबद्दल मुलांना जागरुक केले.
1961 पासून ते रोपांची लागवड करत आहेत. शाळेमागील रिकाम्या जागेत ते रोपे लावतात, मग मुलांसोबत मिळून त्यांची देखभाल करतात. रिकामी जागा आणि रस्त्यांच्या कडेला देखील त्यांनी वृक्षारोपण केले आहे. गावातील लोकांमध्ये देखील त्यांनी पर्यावरण संरक्षणावरून जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या याच कामामुळे लोक त्यांना ‘गाचा सर’ म्हणून हाक मारतात. गाचा या ओडिया शब्दाचा अर्थ वृक्ष असा होतो.
लोकांना जागरुक करण्यासह ते बीज मोफत दान करतात. सागवान, पिंपळ, आंबा यासारख्या भारतीय प्रजातींच्या रोपाच्या लागवडीला ते प्राधान्य देतात. वयाची पंचाहत्तरी गाठूनही त्यांचा वृक्ष-रोपांबद्दलचा निर्धार कमी झालेला नाही. आतायर्पंत त्यांनी 30 हजारांहून अधिक रोपे लावली असून त्याची पूर्ण माहिती त्यांच्याकडे आहे. रोपांची लागवड केल्याने प्राण्यांचे जगही आपण वाचवत असतो. छोटे-छोटे जीव लुप्त झाल्याने मोठे नुकसान होते असे म्हणणाऱया अंतर्यामी यांनी मधमाशी आणि फुलपाखरांना वाचविण्यावरूनही मोहीम राबविली होती.