टीसीएस हाताळणार राम मंदिराचा हिशेब, बांधकामावर प्रतिमहिना 25 कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज
अयोध्या, नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अयोध्येतील राम मंदिराचे 30 टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. मंदिराच्या पहिल्या मजल्याचे आणि गर्भगृहाचे बांधकाम डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज आहे. गर्भगृहात श्री रामलल्ला विराजमान होणार असून प्राणप्रति÷ा पूजाही होणार आहे. त्यानंतर पहिला मजला भाविकांच्या दर्शनासाठी खुला करण्यात येणार आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस (टीसीएस) राम मंदिराचा खर्च हाताळेल.
मंदिराच्या कामकाजाने सध्या वेग पकडला असून आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत बहुतांश काम पूर्ण करण्याकडे नियोजन मंडळाचा प्रयत्न राहणार आहे. मंदिरात राजस्थानमधील भरतपूरचे दगड बसवले जात असून त्याचे कोरीव काम सध्या केले जात आहे. तसेच मकरानाचे पांढरे संगमरवरी दगड गर्भगृहात बसवले जाणार आहेत. मंदिराचा मंडप ग्रॅनाईट दगडांनी तयार केला जात आहे. याच्या वर मंदिराचे खांब उभारण्यात येणार आहेत.
आतापर्यंत 192 कोटी रुपये खर्च
मंदिराच्या उभारणीसाठी आतापर्यंत सुमारे 192 कोटी रुपये खर्च झाल्याचे विश्वस्त सूत्रांचे म्हणणे आहे. आता मंदिराच्या उभारणीसाठी दर महिन्याला सुमारे 25 कोटी रुपये खर्च होणार आहेत. ट्रस्टने खर्च, देणगीदारांच्या पावत्या, मोबाईल मेसेज पाठवणे आदी कामे टीसीएसवर सोपवली आहेत. मात्र, ट्रस्टने अद्याप उत्पन्न आणि खर्चाची माहिती सार्वजनिक केलेली नाही.
17 हजार ब्लॉकमधून मंदिर बांधकाम
मंदिर उभारणीचे दोन टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. आता तिसरा टप्पा सुरू आहे. हा ब्लॉक ग्रॅनाईट दगडांचा बनलेला असून तो पाच फूट लांब, अडीच फूट रुंद आणि तीन फूट उंचीचा आहे. एक ब्लॉक सुमारे अडीच टन वजनाचा 37.5 घनफूट आकाराचा आहे. असेच 17 हजार ब्लॉक मंदिर उभारणीसाठी वापरण्यात येणार आहेत. याची उंची साडेसहा मीटर उंच करण्यात येणार आहे. सध्या दुसरा थर बांधला जात आहे. हे दगड सात थरांमध्ये जोडले जातील. सध्या गर्भगृहाभोवती पाचवा थर टाकला जात आहे.
भक्कम मजबुतीसाठी भूकंपांचा अभ्यास
राम मंदिराच्या मजबुतीसाठी ट्रस्ट कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. यासाठी ट्रस्ट गेल्या 500 वर्षांतील विनाशकारी भूकंप आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीचा अभ्यास करत आहे. असा अंदाज बांधून मंदिराच्या बांधकामाला आणखी मजबुती दिली जाईल, असे ट्रस्टच्या सदस्यांचे म्हणणे आहे. यामध्ये नेपाळमध्ये अलीकडच्या काळात झालेल्या भूकंपांसह इतरांच्या नोंदी शोधल्या जात आहेत.
बांधकामावर एजन्सींची देखरेख
आठ तांत्रिक एजन्सी बांधकामावर लक्ष ठेवून आहेत. राम मंदिर शतकानुशतके अबाधित राहील यात शंका नाही. यासाठी ट्रस्ट अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर काम करत आहे. ट्रस्ट अनेक तांत्रिक एजन्सींची मदत घेत आहे. त्यांच्या अहवालाच्या आधारे पायापासून ते कळसापर्यंतचे काम सुरू राहणार असल्याचे ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले.
लवकरच गर्भगृहाचे बांधकाम आणि त्याभोवती मंडपाचे काम पूर्ण होईल. राजस्थानच्या भरतपूर जिल्हय़ातील बन्सीपहाडपूर भागातील डोंगरांवर हलक्मया गुलाबी वाळूचे कोरीव दगड बसवण्याचे काम सुरू होणार आहे. मंदिरात सुमारे 4.70 लाख घनफूट कोरीव दगड बसविण्यात येणार आहे. आता अयोध्येपर्यंत दगड पोहोचू लागले आहेत.