50 टक्के सूट मिळाल्याने प्रतिसाद
प्रतिनिधी/ बेळगाव
हेल्मेट न घालता वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, कार चालवताना बेल्ट न वापरणे यासह वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना दंडाच्या नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. तरीदेखील त्यांनी दंड भरला नव्हता. त्यामुळे सरकार व न्यायालयाने त्या दंडामध्ये 50 टक्के सूट दिली. लोकअदालतमध्ये हा दंड भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे शनिवारी दुपारी 3 पर्यंत 29 हजार 520 वाहनचालकांनी दंड भरला आहे.
जिल्ह्यामध्ये 26 कोटी दंड बाकी आहे. त्यामुळे किमान 5 ते 6 कोटी दंड वसूल होईल, असा अंदाज होता. मात्र, म्हणावा तसा प्रतिसाद आतापर्यंत वाहनचालकांनी दिला नाही. लोकअदालतीमध्ये दंड भरण्यासाठी मुभा देण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये काही वाहनचालकांनी दंड भरून आपली सुटका करून घेतली आहे.
राष्ट्रीय लोकअदालतमध्ये वाहनचालकांना दंड भरण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर 61 लाख 4 हजार 750 रुपये दंड या अदालतीमध्ये जमा झाला आहे. पहिल्याचवेळी हा दंड जमा झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. तरीदेखील अजूनही याबाबत अधिक जनजागृती होणे गरजेचे असल्याचे दिसून येत आहे.