शरणार्थींना ओळखपत्रांचे वाटप ः 160 शिबिरांमध्ये विशेष खबरदारी
वृत्तसंसथा / ऐझोल
म्यानमारमधील सैन्य राजवटीच्या अत्याचारांनी पीडित शरणार्थी भारतात दाखल होण्याचे सत्र सुरूच आहे. ईशान्येतील राज्य मिझोरममध्ये सुमारे तीस हजार शरणार्थींनी आश्रय घेतला आहे. मिझोरम सरकारने राज्यात पोहोचलेल्या या शरणार्थींचे प्रोफाइलिंग करत डाटाही तयार केला आहे. राज्य सरकारने म्यानमारच्या सर्व शरणार्थींना विशेष ओळखपत्रे जारी केली आहेत.
या ओळखपत्रांद्वारे शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नसल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. मिझोरमची लोकसंख्या सुमारे 12.5 लाख आहे. यातही 30 हजार म्यानमारचे शरणाथीं पोहोचल्याने लोकसंख्येचे संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. मिझोरममधील सुमारे 160 शरणार्थी शिबिरांमधील देखरेख वाढविण्यात आली आहे. हे शरणार्थी स्थानिक क्षेत्रांमध्ये स्थायिक होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे.
मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये सैन्याने सत्तापालट घडवून आणल्यापासून भयभीत लोक समुहांमध्ये टिआऊ नदी पार करत मिझोरममध्ये पोहोचत आहेत. हे शरणार्थी म्यानमारमधील चिन प्रांताचे रहिवासी आहेत. या शिबिरांमध्ये म्यानमारच्या आंग सांग सू की यांच्या नेतृत्वाखालील पूर्वीच्या लोकशाहीवादी सरकारचे 14 लोकप्रतिनिधी देखील पोहोचले आहेत.
महिला अन् मुलांचे प्रमाण अधिक
मिझोरममध्ये पोहोचलेले म्यानमारचे शरणार्थी चंफाई, सियाहा, लांग्तलाई, सेरछिप, हाहथियाल आणि सेतुआल जिल्हय़ांच्या 160 दिलासा शिबिरांमध्ये राहत आहेत. मिझोरममध्ये राहत असलेल्या म्यानमारच्या शरणार्थींमध्ये 11,800 मुले तर 10,200 महिलांचा समावेश आहे. राज्य सरकारने शरणार्थींकरता आतापर्यंत 80 लाख रुपये मंजूर केले आहेत.
मणिपूरमध्ये अनेकांना अटक
अलिकडेच म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या मणिपूरच्या चुराचांदपूर जिल्हय़ात 20 मुलांसह 80 म्यानमारच्या नागरिकांना अटक करण्यात आली होती. त्यांची नंतर इंफाळमध्ये न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी म्यानमारमधून येणाऱया लोकांना रोखण्याची मागणी केली आहे.
लोकसंख्येचे स्वरुप बदलणार
मणिपूरमध्ये म्यानमारचे 5-10 हजार नागरिक राहत आहेत. यामुळे मैतैई आणि नागा समुदायाच्या लोकांना जातीय संतुलन बिघडण्याची भीती सतावू लागली आहे. बहुसंख्याक हिंदू समुदाय मैतैईची लोकसंख्या सातत्याने कमी होत आहे. 2011 च्या जनगणनेनुसार मैतेई राज्यातील एकूण लोकसंख्या 51 टक्के इतके होते. तर 1971 मध्ये हे प्रमाण 66 टक्क्यांच्या आसपास होते.