ऑनलाईन टीम / पिंपरी चिंचवड :
तीनशे कोटींचे बिटकॉईन आणि 8 लाखांच्या खंडणीसाठी पिंपरी चिंचवड पोलीस दलातील शिपायाने आपल्या साथीदारांसह एका व्यापाऱ्याचे अपहरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस शिपायासह 8 जणांना बेड्य़ा ठोकण्यात आल्या आहेत.
दिलीप तुकाराम खंदारे असे आरोपी पोलीस शिपायाचे नाव आहे. तर सुनील राम शिंदे, वसंत श्यामराव चव्हाण, फ्रान्सिस टिमोटी डिसूझा, मयुर महेंद्र शिर्के, प्रदीप काशिनाथ काटे, शिरीष चंद्रकांत खोत, संजय ऊर्फ निकी राजेश बंसल अशी अटक करण्यात आलेल्या इतर आरोपींची नावे आहेत.
पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप खंदारे हा पिंपरी चिंचवड पोलीस दलात सायबर विभागात कार्यरत असताना एका व्यापाऱ्याकडे मोठय़ा प्रमाणात क्रिप्टो करन्सी असल्याचे त्याला समजले होते. त्या व्यापाऱ्याचे अपहरण केले तर मोठय़ा प्रमाणात क्रिप्टो करन्सी आणि पैसे मिळू शकतात, असे विचार त्याच्या मनात घोळू लागले. त्यामुळे त्याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून त्या व्यापाऱयाचे अपहरण केले. अपहरण केल्यानंतर दिलीप खंदारे याने विनय सुंदरराव याला अलिबाग येथे डांबून ठेवलं. मात्र, पोलीस आपल्या मागावर असल्याचे समताच अपहरण केलेल्या विनय याला त्यांनी पुन्हा वाकड परिसरात सोडून दिले.
300 कोटींच्या क्रिप्टोकरन्सी आणि 8 लाखांच्या खंडणीसाठी हे अपहरण करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या आरोपींना बेडय़ा ठोकल्या.