पुणे : बिबवेवाडी येथील राज्य कामगार विमा योजनेच्या (ESIC) रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यासाठी 305 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. एकूण प्रकल्पीय रक्कम 470 कोटी रुपये असून, त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांनी दिली.
मिसाळ म्हणाल्या, पर्वती मतदार संघात एकही शासकीय रुग्णालय नाही. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांची मोठी गैरसोय होते. बिबवेवाडी येथील ईएसआयसीच्या नऊ एकर जागेत ससूनच्या धरतीवर रुग्णालय व्हावे, यासाठी गेली दहा वर्षे सातत्याने पाठपुरावा करीत असून, लवकरच विस्तारीकरणाचे काम सुरू होईल.
अधिक वाचा : विधानभवनाच्या मध्यभागी लागणार बाळासाहेबांचं तैलचित्र
सर्व वैद्यकीय सोयींनी युक्त सात मजल्यांच्या इमारतीत 60 हजार चौरस फूट बांधकाम होणार आहे. तळमजल्यावर बाह्यरुग्ण कक्ष, दुसऱ्या मजल्यावर बाह्य आणि आंतररुग्ण सुपर स्पेशालिटी सुविधांसाठी स्वतंत्र कक्ष, तीन ते सातव्या मजल्यापर्यंत साधारण ते अतिदक्षता विभागाचे कक्ष असतील. रेडिओलॉजी, बायोकेमेस्ट्री, मायक्रोबायोलॉजी अशा विविध प्रयोगशाळांचा समावेश असणार आहे.